पाकिस्तानमध्ये कैद कुलभूषण जाधव यांची कुटुंबियांनी घेतली भेट
हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानमध्ये कैद असणाऱ्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियाची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात भेट झाली आहे.
इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानमध्ये कैद असणाऱ्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियाची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात भेट झाली आहे. कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांनी कुलभूषण यांची भेट मागितली होती. त्यानुसार आज त्यांची अर्ध्या तासाची भेट झाली.
काचेच्या आडून कुलभूषण यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी चर्चा केली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांशी पहिल्यांदा संवाद साधला. भेट झाल्यानंतर त्या दोघी आजच भारतात परतणार आहेत.
या भेटीवेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे. पी. सिंगदेखील त्यांच्यासोबत होते. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेल्या अपीलानंतर या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय.