नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना पुन्हा एकदा कोठडीत भेटण्याची परवानगी भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे. त्याचसोबत भारताने यावेळी आणखी ४ कैद्यांना उच्चायुक्त संपर्क देण्याची मागणी केलीय. त्याचसोबत आणखी १० भारतीय कैद्यांना तातडीने सोडून देण्याची मागणी केलीय. माजी नौदल अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना उच्चायुक्तांशी संवाद साधण्याची परवानगी देण्याची मागणी भारताने याआधी १३ वेळा केलीय. या मागणीसह पाकिस्तानच्या अन्य कारागृहात बंदी असलेल्या भारताच्या आणखी ४ कैद्यांनाही उच्चायुक्तांशी संपर्क करू देण्याची मागणी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याशिवाय शिक्षा पूर्ण होऊनही पाकिस्तानी कारागृहात खितपत पडलेल्या अन्य १० कैद्यांना तातडीने सोडण्याची मागणी भारताने केलीय. भारतीय कैद्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची तपासणी करण्यासाठी भारताच्या वैद्यकीय पथकाला परवानगी देण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय मच्छिमारांचीही माहिती पाकिस्तान देत नसल्याचा आरोप भारताने केलाय. पाकिस्तानी कारागृहात अंदाजे ४०० हून अधिक भारतीय मच्छिमार खितपत पडल्याची माहिती आहे.


मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी तुरुंगात पाच नागरिक आणि ३८५ भारतीय मच्छीमार कैद आहेत. हे सर्व भारतीय असल्याच्या माहितीची खातरजमा करण्यात आलीय. त्यांना लवकरात लवकर भारताकडे सुपूर्द करण्यात यावं असा आग्रह करण्यात आलाय.