कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्णय
कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.
हेग : कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे. कुलभूषणच्या बाजूने निर्णय लागण्याचा भारताला विश्वास आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.
भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंबंधी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुलकॉवी अहमद युसूफ संध्याकाळी ६.३० वाजता निर्णय देणार आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावरील दोन्ही आरोप भारताने फेटाळले आहेत. जाधव हे इराणमध्ये व्यवसायानिमित्त गेले असताना पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तान-इराण सीमेजवळून त्यांचे अपहरण केले, असे भारताने म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानने सक्तीने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा कबुलीजबाब घेतला. त्यानंतर त्यांना कोणताही वकील न देता एप्रिल २०१७मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली, असा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. या फाशीविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली आहे. आज या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.