लॅन्डिंग करताना तुटलं विमान, पायलटच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशांचा जीव
विमान अपघातानंतर रन वे तब्बल १० तास बंद
लापाजस : पेरुच्या एका विमान कंपनीचं बोईंग ७३७ विमानाचा विमानतळावर उतरताना अपघात झालाय. बोलिवियाच्या एका विमानतळावर उतरताना हा अपघात घडला. विमान खाली उतरताना लॅन्डिंग गिअर तुटल्यानं हा अपघात झाला. हे विमान पेरूच्या कुजकोहून येत होतं. यामुळे जवळपास १० तास रनवे बंद ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात असलेल्या १२२ प्रवाशांसहीत विमानाच्या चालक दलाचे सदस्य सुखरुप आहेत.
अपघातानंतर विमानाला हटवणं कठिण झाल्यामुळे रन वे तब्बल १० तास बंद ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे अल्टो विमानतळावर येणाऱ्या जाणाऱ्या अनेक विमानांना याचा फटका बसला.
हा अपघात कसा झाला? यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याविषयी चौकशी सुरू आहे. या अपघातादरम्यान कुणालाही इजा झाली नाही, ही गोष्ट अत्यंत दिलासादायक असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
या अपघातानं अतिशय भीषण रुप घेतलं असतं. परंतु, पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.