घरमालकाने अचानक भाडेकरुला ठोठावला 52 हजारांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का
Rented Home Shocking News: भाड्याने घर घेतल्यानंतर घरमालकाचा जाच अनेकांच्या नशिबात असतो. घरमालकाबरोबर उडणारे खटके सुद्धा सामान्य बाब आहे. मात्र एका घरमालकाने भाडेकरुबरोबर जे केलं ते वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
भाडेतत्वावर घर शोधणं हे एखादं दिव्यच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही आठवड्यांपूर्वी मुंबईमध्येच मराठी महिलेला भाड्याने घर नाकारल्याच्या मुद्द्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. खरं तर भाड्याने घर शोधायचं म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. अनेकदा घरमालकाच्या वाटेल त्या अटी ऐकून चक्रावून जायला होतं. बऱ्याचदा घरभाड्यावरुन व्यवहार होता होता राहून जातो. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार घरमालकाने भाडेकरुबरोबर असं काही केलं आहे की ते वाचून कधी ना कधी या भाडेतत्वाच्या घराच्या पाठशिवणीच्या खेळातून गेलेल्या व्यक्तीला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नक्की घडलं काय?
झालं असं की, ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील एका भाडेकरुकडे त्याच्या घर मालकाने तब्बल 52 हजार रुपयांची मागणी केली. बरं या भाडेकरुची चूक काय होती तर घरातील लाकडी फरशीवर एक छोटासा ओरडखा या भाडेकरुन ओढला गेला. अगदी नकळतपणे झालेल्या या चुकीसाठी घर मालकाने थेट 1 हजार डॉलर्सचा दंड भाडेकरुकडून आकारला. लाकडी फ्लोअवर आलेल्या या एका छोट्याश्या ओरखड्यामुळे आपल्याला संपूर्ण फ्लोअरिंग बदलावं लागणार आहे असा दावा या घरमालकाने केला आहे.
भाडेकरुचं म्हणणं काय?
भाडेतत्वावर राहणाऱ्या या भाडेकरुने रेडिट या सोशल नेटवर्किंग साईठवर बेबीबटरकप नावाच्या खात्यावरुन एक पोस्ट करत सविस्तर माहिती दिली आहे. “माझ्या घरमालकाने लाकडी फरशीवरील पॅनलवर एक छोटासा ओरखडा आल्याने 1 हजार डॉलर्सचा दंड मागितला आहे. ही काय मस्करी लावलीय की काय कळत नाही. त्याचं म्हणणं आहे की या ओरखड्यामुळे त्याला संपूर्ण फ्लोअरिंग बदलावं लागणार आहे. माझ्याकडून चुकून लाकडी पॅनलवर तो ओरखडा ओढला गेला. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तो ओरखडा फारच बारीक आणि किरकोळ आहे. तो नीट दिसतही नाही. या अशा वागण्याचा काही अर्थ आहे का?” असा सवाल संतापलेल्या भाडेकरुने रेडिटवर विचारला आहे.
अनेकांनी नोंदवला आक्षेप
रेडिटवर अनेकांनी घरमालकाने केलेली मागणी हस्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. बेजबाबदारपणे भाडेकरुकडून हे झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल. मात्र ओरखडा फारच छोटा असेल तर 1 हजार डॉलर्स जास्त दंड आहे, असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने नवीन फ्लोअरिंगचा खर्च घरमालक भाडेकरुच्या माथी मारु पाहत आहे, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
सरकारकडे मागणार होते दाद पण...
या प्रकरणी थेट सरकार दरबारी अर्ज करण्याची भूमिका भाडेकरुने घेतली. मात्र नंतर 500 डॉलर्सचा दंड देण्यास दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आणि प्रकरणावर पडता पडला.