8 भाडेकरु घरात असतानाच मालकाने स्वत: लावली घराला आग; समोर आलं धक्कादायक कारण
Home On Fire by Landlord Shocking Reason: या प्रकरणामध्ये 66 वर्षीय घरमालकाला अटक करण्यात आली असून या घटनेमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.
Home On Fire by Landlord Shocking Reason: अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एका वयस्कर घरमालकाला टक केली आहे. 8 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका या घरमालकावर ठेवण्यात आला आहे. भाडेकरु भाडं देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत घरमालक आणि भाडेकरुमध्ये झालेल्या पैशावरुन झालेल्या वादामधून या व्यक्तीने भाडेकरु घरात असता घराला आग लावल्याचं वृत्त हफिंग्टन पोस्टने दिलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रफीक इस्लाम असं असून आरोपी 66 वर्षांचा आहे.
घरात राहत होते 8 जण
रफीक इस्लामने ब्रुकलीन येते त्याच्या मालकीचं घर मागील महिन्यामध्ये स्वत: जाळून टाकलं. धक्कादायक बाब म्हणजे या घरामध्ये 2 वयस्कर व्यक्ती 6 मुलांबरोबर भाड्याने राहत असतानाच रफीकने इमारतीला आग लावली. न्यू यॉर्क सिटी फायर डिपार्टमेंटने त्यांच्या फेसबुक पेजवरील माहितीनुसार, घरात राहणाऱ्या या कुटुंबाने भाडं देण्यास तसेच घर सोडण्यास नकार दिल्याने रफीक नाराज होता आणि त्यामधूनच त्याने हे कृत्य केलं.
नेमकं घडलं काय?
'न्यू यॉर्क सिटी फायर डिपार्टमेंटच्या फायर मार्शल्सने घराला लागलेल्या आगीच्या प्रकरणामध्ये घरमालकाला अटक केली आहे. या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडोत्रींनी भाडं देणं बंद केलं तसेच ते घर सोडून जाण्यास तयार नसल्याने रफीक इस्लाम नाराज होता. त्यामुळे रफीकने घराच्या आजून जाणाऱ्या जीन्याला आग लावली. ही आग लावण्यात आली तेव्हा वरच्या मजल्यावरील या घरात 2 वयस्कर व्यक्ती आणि 6 मुलं होती,' असं न्यू यॉर्क सिटी फायर डिपार्टमेंटने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एका महिन्याच्या तपासानंतर समोर आलं सत्य
न्यू यॉर्क सिटी फायर डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, 5 पीडितांनी घरमालकाने गॅसची लाईन आणि इलेक्ट्रीक लाईन कापण्याची तसेच घर जाळून टाकण्याची धमकी दिली होती असा जबाब नोंदवला आहे. महिनाभर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये रफीक इस्लाम हा मास्क आणि हूड घालून घराला आग लागण्याच्या काही मिनिटांपूर्वीच घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तसेच मास्क आणि हूड न घातलेला रफीक इस्लामचा फोटोही पोलिसांना सापडला आहे.
कुटुंबाने कसा वाचावला आपला जीव?
'न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार, 8 सदस्यांच्या या कुटुंबाने सुदैवाने स्वत:चे जीव वाचवले. पालकांनी त्यांच्या 2 मुलांना बाल्कनीमधून खाली शेजाऱ्यांच्या हाती फेकली. उरलेल्या 4 मुलांना अग्नीशामन दलाच्या जवानांनी वाचवलं तर पालकांनी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आपला जीव वाचवला.
आग लागल्याच्या दुसऱ्या दिवशीच केला हा दावा
आग लागल्याच्या दुसऱ्या दिवशी रफीक इस्लामने कोर्टामध्ये याचिका दाखल करुन दुसऱ्या मजल्यावरील भाडोत्री मला 26,592 अमेरिकी डॉलर्स देणं लागते असा दावा केला. मात्र घराची स्थिती ठिक नव्हती. घरात भरपूर झुरळं आणि उंदीर आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी पडझड झाल्याने आम्ही भाडं दिलं नाही असा युक्तीवाद भाडोत्रींनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच आता हा धक्कादायक खुलासा समोर आला असून रफीक इस्लामविरोधात अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.