मुंबई : या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी रात्री  १०-३८ वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री १२ - ४० वाजता जास्तीत जास्त म्हणजे ८९ टक्के  चंद्रबिंब  पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री २-४२ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून दिसेल असेही श्री. सोमण यांनी सांगितले.


२०२० मध्ये चाकरमान्यांसाठी  सुट्यांची चंगळ,लीपवर्ष असल्याने कामासाठी वर्षात  एक दिवस जास्त ,  खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शन, ब्ल्यू मून योग , सुवर्ण खरेदी करणारांसाठी चार गुरुपुष्य योग, आश्विन अधिकमास आणि विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण  यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की यावेळी लीप सेकंद पाळला जाणार नसल्याने मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता नूतन वर्ष २०२० सुरू होणार आहे. तसेच सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस मिळणार  आहेत. कामांची पूर्तता करण्यासाठी १ दिवस जास्त मिळणार आहे.