वयाच्या १३ व्या वर्षीच `तो` आयटी कंपनीचा मालक
ऐकावं ते नवलंच... मुळच्या केरळच्या असणाऱ्या या मुलाची किर्ती महान
मुंबई : 'मूर्ती लहान पण, किर्ती महान' ही ओळ आजवर अनेकदा आपल्या कानांवर पडली आहे. एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावर, त्याच्या राहणीमानावर न जाता त्याच्या कर्तृत्वाला अधोरेखित करत त्याच बळावर त्या व्यक्तीची ओळख ही एकच ओळ करुन देते. सध्याच्या घडीला याचा उल्लेख होण्याचं कारण म्हणजे १३ वर्षांचा एक मल्याळी मुलगा.
आदित्यन राजेश असं नाव असणाऱ्या दुबईच्या या मुलाने चार वर्षांपूर्वी पहिलं मोबाईल अॅप्लिकेशन सुरु केलं. सध्याच्या घडीला तो एका आयटी (सॉफ्टवेअर)फर्मचा मालक आहे. बसला ना तुम्हालाही धक्का? हे स्वप्न किंवा एखादा चमत्कार नसून खरंच असं घडलं आहे.
वयाच्या नवव्या वर्षी आदित्यनने पहिलं मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केलं. बरं, हे अॅप्लिकेशन सुरु करण्यामागेही रंजक गोष्ट आहे. सर्व गोष्टी करुन, खेळ खेळून वैतागल्यामुळे अखेर त्याने वेळ दवडण्यासाठी म्हणून हे अॅप तयार केलं होतं. फक्त अॅपच नव्हे, तर तो लोगो आणि वेबसाईटही तितक्याच शिताफीने डिझाईन करतो.
'खलिज टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री केलेल्या आदित्यनने वयाच्या १३ व्या वर्षी 'ट्रायनेट सोल्यूशन्स' नावाची स्वत:ची कंपनी सुरू केली.
आपल्या या कंपनीविषयी माहिती देत आदित्यन म्हणाला, 'एका कंपनीचा अधिकृतपणे मालक म्हणवण्यासाठी मला वयाची १८ वर्षे पूर्ण होणं गरजेचं आहे. तरीही मी आणि माझे मित्र एखाद्या कंपनीप्रमाणेच काम करतो. आतापर्यंत आम्ही १२ क्लाइंटची कामं केली आहेत. मुख्य म्हणजे त्यांना डिझाईन आणि कोडिंग सर्व्हिस देत आम्ही त्यासाठी कोणतंही मानधन आकारलेलं नाही.' आदित्यनला आणखी तीन जणांचं सहकार्य यात त्याला मिळत असून, ते त्याचेच मित्र असल्याचं कळत आहे.
मुळचा केरळच्या तिरुवल्ला येथील असणाऱ्या आदित्यनचं कुटुंब तो पाच वर्षांचा असताना दुबईत स्थलांतरित झालं. तंत्रज्ञान, संगणक याकडे त्याचा बालपणापासूनच फार कल असल्याचं सांगत, 'पहिल्यांदा मला बाबांनी BBC Type ही वेबसाईट दाखवली होती. या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना टाईप करण्याविषयीचं प्रशिक्षण मिळत', अशी माहिती त्याने दिली होती.
जिज्ञासा, जिद्द, चिकाटी या गुणांच्या बळावर इतक्या कमी वयात लक्षवेधी कामगिरी करणारा आदित्यन हा सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. मुख्य म्हणजे सध्याच्या घडीला तो परदेशात असला तरीही संपूर्ण केरळ आणि भारताची मान मात्र त्याच्या या कर्तृत्वामुळे गर्वाने उंचावत आहे, असं म्हणायला हरकत नाही.