मालदीवमध्ये भारतीय लष्करी हस्तक्षेपाची मागणी
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्यादरम्यान झालेल्या मोठ्या वाद-विवादानंतर मालदीव मोठ्या राजकीय संकटात अडकलंय. याचाच परिणाम म्हणून मालदीवमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
माले : सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्यादरम्यान झालेल्या मोठ्या वाद-विवादानंतर मालदीव मोठ्या राजकीय संकटात अडकलंय. याचाच परिणाम म्हणून मालदीवमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
लष्करी हस्तक्षेपाची मागणी
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमडीपीचे नेते मोहम्मद नाशीद यांनी भारताने लष्करी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. मालदीवच्या प्रश्नावर अखेर भारताने आपलं मत मांडलं आहे. आणीबाणी जाहीर करण्याच्या राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष सातत्याने भारताने याविषयी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करत आहेत. मालदीवमधील विरोधी पक्ष भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांच्या संपर्कात आहेत.
विरोधी पक्षाचा आरोप
राष्ट्राध्यक्ष यामीन चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप मालदीवमधल्या विरोधी पक्षांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर मालदीवचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमुर्तींना अटक करण्यात आली आहे.
लोकशाही देशांकडे मदत
मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतासह अन्य लोकशाही देशांकडे मदत मागितली आहे. न्यायिक प्रशासनाचे प्रमुख हसन सईद यांच्यावर लाच घेतल्याच्या आरोप ठेऊन त्यांच्या घरावर छापा मारण्यात आला. न्यायाधीशांना धमकावले जात आहे. या परिस्थितीत मालदीवमध्ये कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी भारताने कठोर भूमिका घेतली पाहिजे असे आम्हाला वाटते असे मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटले आहे.