किती वाईट; 300 ठिकाणी Interviews नंतरही नोकरी नाही; पुढे त्यानं जे केलं त्याचा विचारही करणं कठीण
असा बेरोजगार तुम्हीही पाहिला नसेल....
मुंबई : हल्लीच्या दिवसांमध्ये हाताशी नोकरी आणि राहण्यासाठी घर असणं ही फार मोठी गोष्ट ठरत आहे. अनेक ठिकाणी आलेली आर्थिक मंदीची लाट आणि त्यातच ओढावलेलं कोरोनाचं संकट यामुळं अनेकांच्या नोकरीवर गदा आली, अनेकांना वारंवार प्रयत्न करुनही नोकरी मिळेनाशी झाली. अशाच एका नोकरी न मिळणाऱ्या अर्थात बेरोजगार तरुणानं सध्या इंटरनेट गाजवलंय. (Job News)
या तरुणानं जवळपास 300 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, नोकरीसाठी अर्ज केले पण तरीही त्याच्या वाट्याला अपयशच आलं. उत्तर आयर्लंडमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय क्रिस हार्किन यानं सप्टेंबर 2019 पासून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पदवीधर असूनही त्याला नोकरी मिळालीच नाही. यासाठी त्यानं 300 ठिकाणच्या पायऱ्या झिजवल्या. पण, पदरात अपयशच पडलं.
अखेर या तरुणानं नोकरी शोधण्यासाठी एक शक्कल लढवली. ही एक अशी शक्कल होती, ज्याचा विचारही करणं जवळपास अशक्यच. त्यानं नोकरी शोधण्यासाठी म्हणून आपलेच मोठमोठे बिलबोर्ड बनवून घेतले.
'द मिरर'च्या वृत्तानुसार त्यानं या बिलबोर्डवर स्वत:चा फोटो लावत, थोडक्यात आपलं शिक्षण आणि कोणत्या क्षेत्रात नोकरी हवी आहे याचा उल्लेख केला. यासाठी त्यानं मोठा खर्च केला. जवळपास 40 हजारहून जास्त खर्च त्यानं या बिलबोर्डसाठी केला. पण, हा सारा आटापिटा करुनही त्याच्या वाट्याला अपयशच आलं. हातात नोकरी नसताही नोकरी शोधण्यासाठी म्हणून त्यानं इतका खर्च केला, आता काय म्हणावं याला?