`हा` व्यक्ती चक्क ९ वर्षापासून विमानतळावर राहतोय...
नवरा बायकोची भांडण अगदी सामान्य आहेत.
बिजींग : नवरा बायकोची भांडण अगदी सामान्य आहेत. ती विसरून अनेक जोडपी जीवनाच्या चढउतारात एकमेकांना साथ देताना दिसतात. अगदी नाही पटलं तर विभक्त होण्याचा निर्णय घेतात.
काहीसा वेगळा निर्णय
मात्र बिजींगमधल्या एका माणसाने काहीसा वेगळा निर्णय घेतला. आपल्या बायकोचा भांडकुदळ स्वभाव असह्य झाल्याने त्याने आपले घर सोडले आणि थेट बिजींगचे विमानतळ गाठले. पण तेथून पुढे कोठेही न जाता त्याने विमानतळावरच आपले बस्तान मांडले. या व्यक्तीचे नाव आहे वेई जिआनगुओ.
काय आहे हे प्रकरण?
थोडेथोडके नव्हे तर चक्क ९ वर्ष तो विमानतळावरच रहात आहे. २००८ मध्ये त्याचे त्याच्या बायकोसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याने आपले घर सोडले आणि विमानतळावरचा एक चांगला कोपरा निवडून तिथेच आपलं बस्तान मांडलं. तेच त्याचं घर आहे. विजेवर चालणारी एक शेगडी घेऊन तिथेच स्वयंपाक करतात आणि जेवून तिथेच झोपतात. त्यांना दरवर्षी सरकारकडून ठराविक रक्कमेचं अनुदान मिळतं. त्यातच त्यांचं भागतं. त्यांच्या या अनोख्या दिनचर्येवर ‘पिअर व्हिडिओ’नं त्यांच्यावर एक व्हिडिओही तयार केला आहे.
आपली जागा सोडली नाही...
बिजींगच्या विमानतळावर राहीला आल्यापासून त्यांनी काही आपली जागा सोडली नाही. आवश्यक वस्तू घेण्यासाठीच ते विमानतळा बाहेर पडतात. ‘पिअर व्हिडिओ’च्या माहितीनुसार विमातळावरील कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण ९ वर्षात त्यांना काही यश आले नाही. विमानतळावरचा सुरक्षा बंदोबस्त कडक असला की वेई तात्पुरतं आपलं बस्तान दुसरीकडे हलवतात. पण दोन -चार दिवस झाले की पुन्हा ते विमानतळावर येतात.