Letter Posted 28 Years Ago: ऑगस्ट 2022 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये पोस्ट खात्याने पुकारलेल्या संपामुळे पोस्टाचे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. अनेकांनी यासंदर्भात तक्रार नोंदवताना या संपाच्या बॅकलॉगमुळे बरीच कामं अडकून राहिली आणि अगदी डिसेंबरमधील नाताळासाठी पाठवलेली पत्रं तसेच भेटवस्तूही फार उशीरा पोहचल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली होती. मात्र सध्या ब्रिटनमध्ये घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेट्रो या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 28 वर्षांपूर्वी पोस्ट केलेलं एक पत्र 2023 मध्ये आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलं आहे.


कधी पाठवलेलं पत्र?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

60 वर्षीय जॉन रेनबो यांना हे पत्र मिळालं आहे. हे पत्र जवळजवळ तीन दशकांपूर्वी म्हणजेच 13 फेब्रुवारी 1995 साली पोस्ट करण्यात आलं होतं. हे पत्र जॉन यांनी उघडून पाहिलं तेव्हा त्यावर 25 पी रॉयल मेलचं प्रथम श्रेणीचं तिकीट होतं. हे तिकीट पाहून जॉन यांना आश्चर्य वाटलं. कारण हे तिकीट 1995 साली पाठवल्या जाणाऱ्या पत्रांसाठी वापरलं जायचं. हे पत्र ब्रिजवॉटर येथून पोस्ट करण्यात आलं होतं. हे पत्र वॅलेरी जार्विस-रीड यांच्या नावाने पाठवण्यात आलं होतं.


पत्र ज्या महिलेला पाठवलेलं ती हयात नाही


जॉन यांनी हे पत्र स्वीकारलं आहे. मात्र वॅलेरी जार्विस-रीड ही महिला जवळजवळ 2010 पर्यंत या पत्त्यावर राहत होत्या. वॅलेरी यांचा मृत्यू झाल्याचंही जॉन यांनी सांगितलं. वॅलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांचं घर आपल्याला एका एजंटच्या माध्यमातून विकलं गेलं असं जॉन यांचं म्हणणं आहे. "हे पत्र या घरात माझ्यापूर्वी राहणाऱ्या एक माहिलेसाठी होतं. त्या मागील 12 ते 15 वर्षांपासून या ठिकाणी राहत नाही. आम्ही पत्र उघडलं त्यावर नजर टाकली तेव्हा हे पत्र फारच अस्पष्ट आणि थोडं विचित्र वाटलं. जेव्हा आम्ही या पत्रावरची तारीख पाहिली तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. 3 ऑगस्ट 1995 अशी तारीख पत्रावर लिहिलेली होती. हे पत्र अचानक कसं आलं कळत नाही," असं जॉन म्हणाले. 


पत्रात नेमकं काय होतं?


तीन दशकांपूर्वी पाठवलेलं हे पत्र अगदी सुस्थितीत होतं. या पत्राच्या आतमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी जॉन आणि त्यांच्या घरातील व्यक्ती फारच उत्सुक होत्या. जॉन यांनी पत्र उघडलं तेव्हा त्यामध्ये 1880 मधील एका कुटुंबाबद्दलचा मजकूर होता. ज्यात लहानपणीच्या आठवणी होत्या. पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने त्याची मुलं कशी मोठी झाली वगैरे याबद्दल लिहिलं होतं. 


त्यांच्या नातेवाईकांना कळवावं


एका शेजाऱ्याने जॉन यांनी सांगितलं केलं की रीड या बोट चालवायच्या. त्यांचे पती 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ लष्करामध्ये काम केलं होतं. जॉन यांनी, "त्या जेव्हा इथे रहायच्या तेव्हा त्यांचं फार वय झालं असावं. आमचे सध्याचे शेजारी त्यांना ओळखायचे. पत्र पाठवणाऱ्यांचे नातेवाईक अस्तित्वात असतील तर त्यांना हे पत्र निश्चित स्थळी पोहचलं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं," असं म्हटलं.


जो काही गोंधळ झाला त्याबद्दल दिलगिरी


हे पत्र एवढ्या कालावधीनंतर कसं आलं यासंदर्भात पोस्ट व्यवस्थेचं व्यवस्थापन करणाऱ्या 'रॉयल मेल'च्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अशा घटना कधीतरी घडतात. नेमकं कशामुळे हे असं झालं याबद्दल आमच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. या प्रकरणात जो काही गोंधळ झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो," असं 'रॉयल मेल'नं सांगितलं.