FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमीनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा... या साऱ्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल. मात्र हे असलं घर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बांधतोय असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. 39 वर्षीय झुकरबर्ग हे असं घर हवाई बेटांवरील कवौई येथे बांधत आहे. बॉण्डची भूमिका साकारणाऱ्या प्रिस ब्रोसनान यांच्या घरापासून मार्कचं हे घर अवघ्या 10 मैलावर आहे. मात्र या 1400 एकरांच्या बेटावर खरोखरच मार्क झुरबर्ग नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याच्या उद्देशाने हे असं हायटेक घर बांधतोय का याबद्दलची ठोस माहिती मिळालेली नसली तरी या ठिकाणी बांधकामास सुरुवात झाली आहे, असं 'डेली युके'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.


संपूर्ण गावच वसवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार मार्क झुकरबर्गला आपला खासगीपणा जपण्याची आवड आहे. अर्थात एकीकडे फेसबुकसारख्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये लोकांची खासगी माहिती उपलब्ध करुन देणारी व्यक्ती स्वत: मात्र फार खासगी आयुष्य जगणं पसंत करते. मार्क झुकरबर्गने या बेटावर जो प्रकल्प उभारण्याचा विचार केला आहे तो उत्तर अमेरिकेतील सर्वात महत्त्वकांशी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये मार्क 2 बंगलेच बांधणार आहे असं नाही तो संपूर्ण गावच वसवणार आहे. मार्कचं प्रेसीला चॅनबरोबर 2012 मध्ये लग्न झालं आहे. या दोघांना 3 मुलं आहेत. मार्क आणि प्रेसिलाने सर्वात आधी हवाईमध्ये आहू येथे 2013 साली पहिल्यांदा प्रॉपर्टी विकत घेतली होती. 


30 बेडरुम, 30 बाथरुम, 11 ट्री हाऊस अन्...


कवौई हे बेट स्वर्गासारखं असल्याचं म्हटलं जातं. या बेटावर वर्षावनांबरोबरच काही धबधबेही आहे. निसर्गसौंदर्याने हे बेट नटलेलं आहे. अनेक चित्रपटांचं या बेटावर शुटींग झालेलं आहे. या इमारतीसाठीचं कुंपण उभारण्यास सुरुवात झाली आहे. या कुंपणामध्ये एक डझनहून अधिक इमारती आहेत. यात गेस्ट हाऊसही आहेत. या ठिकाणी एकूण 30 बेडरुम आणि 30 बाथरुम असणार आहेत. दोन आलिशान बंगल्यांचा एकूण एरिया हा 55,000 स्वेअर फूट म्हणजेच एका फुटबॉल मैदानाऐवढा असणार आहे. या ठिकाणी लिफ्ट, ऑफिससाठीची जागा, कॉन्फरन्स रुम आणि इंडस्ट्रीयल साईज किचन असणार आहे.


एका इमारतीमध्ये व्यायामशाळा, स्वीमिंग पूल, सोना, हॉट टब आणि टेनिस कोर्ट असणार आहे. या घराच्या आजूबाजूला 11 झाडांवर ट्री हाऊसेस असणार आहेत. ही घरं रोप ब्रिजेसने जोडलेली असतील. हे दोन्ही बंगले एका मोठ्या सुरुंगाने जोडलेली असतील. तसेच या बंगल्यांखाली जमीनीमध्ये 5000 स्वेअर फुटांचा बंकरही असणार आहे. यातही झोपण्याची जागा, तांत्रिक गोष्टींसाठीही जागा आणि इतर गोष्टी असतील.


...म्हणून स्थानिकांचा विरोध


घराचे मुख्य दरवाजे बंकर्ससाठी वापरण्यात येणाऱ्या दरवाजांसारखे बांधले जातील. धातूच्या पातळ तुकड्यांमध्ये कॉंक्रीटचा वापर करुन हे दरवाचे तयार केले जातील. मात्र या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांना अद्याप स्वत:ची हक्काची घर नसताना मार्क झुकरबर्ग इथे घर बांधत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. मार्कने ही जागा विकत घेतल्यानंतर त्याने आधी एक लांबलचक भींत उभारल्याने स्थानिकांचा समुद्राचा व्ह्यू आडवला गेला. या ठिकाणी एवढं बांधकाम केल्यास बेटाचं निसर्ग सौंदर्य नष्ट होईल अशी स्थानिकांना भीती आहे. मात्र मार्कच्या प्रवक्त्यांनी यापूर्वीच्या मालकाला या बेटांवर 84 बंगले बांधायचे होते अशी आठवण करुन दिली आहे.