नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने दिलगिरी व्यक्त केलीय. फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्यानं आपल्याला माफ करण्यात यावं, असं झुकरबर्गनं म्हटलंय. झुकरबर्ग यांनी कोणत्याही विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख केलेला नाही. मात्र अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने फेसबुकचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी केला, याचे पुरावे समोर आले आहेत. त्याचा संदर्भ झुकरबर्गच्या माफीमागे असल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलं आहे.


आपल्या फेसबुक अकाऊंटवरून झुकरबर्गने हे माफीपत्र प्रसिद्ध केलंय. या वर्षभरात ज्यांना दुःख पोहचवलं त्यांची माफी मागतो असं झुकेरबर्गनं म्हटलंय. आपल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाहीसुद्धा झुकरबर्गनं दिली आहे. रशियाच्या ४७० बनावट कंपन्यांनी जून २०१५ ते मे २०१७ दरम्यान फेसबुकवर केलेल्या जाहिराती अमेरिकेच्या संसदेला सादर केल्या जातील असं फेसबुकनं म्हटलं होतं. या जाहिरातींमधून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी थेट प्रचार करण्यात आला नव्हता. मात्र गे हक्क, वंश, शरणार्थी आणि शस्त्र बाळगण्याचा हक्क या आक्षेपार्ह बाबींचा समावेश होता.