मुंबई : आपण अनेक विवाह पाहिले असतील... परंतु, असा विवाह मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहाल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आयुष्यातील एक खास भाग असलेल्या विवाह सोहळ्याला 'स्पेशल' बनवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही... अशाच एका जोडप्यानं हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी वेगळ्याच पद्धतीनं आपल्या विवाहाचं आयोजन केलं. 


जगातील सर्वात थंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये या जोडप्यानं आपल्या विवाहाचं आयोजन केलं. शून्याहूनही कमी तपमानातल्या गोठवणाऱ्या थंडीवर मात करत हे जोडपं विवाहबंधनात अडकलं. अंटार्क्टिक टेरिटरीमध्ये विवाह करणारं हे पहिलंच जोडपं ठरलंय.  


जुली बॉम आणि टॉम सिलवेस्टर... दोघंही १० वर्षांपासून एकत्र काम करत होते. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. 


उल्लेखनीय म्हणजे, वधुनं परिधान केलेला विवाहाचा ड्रेस एखाद्या शोरूममधून विकत घेतलेला नव्हता. तर अत्यंत कमी खर्चात तो तयार करण्यात आला होता. नारंगी रंगाचा हा ड्रेस एका जुन्या तंबूच्या कपड्यापासून बनवण्यात आला होता. 



जुली आणि टॉमच्या विवाहासाठी त्यांचे जवळपास १८ सहकारीही हजर होते. हे सगळे ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेच्या सर्वात मोठ्या रिसर्च स्टेशनवर काम करतात. इथं वेगवेगळ्या देशांच्या रिसर्च टीम काम करतात... शिवाय काही गाईडही आहेत... त्यांच्यापैंकीच जुली आणि टॉम एक आहेत...