कोरोनामुळे इमारतीच्या खिडकीत उभे राहून लग्न, शेजारच्यांनी खिडकीतूनच दिल्या शुभेच्छा
कधी विचार ही केला नसेल की असं लग्न होईल.
मुंबई : जगभरात कोरोनाचं संकट असल्याने अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखी स्थिती आहे. लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही कर इतर कार्यक्रम करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या दरम्यान अनेकांचं विवाह लांबणीवर गेले आहेत. पण काही जण मात्र लोकांच्या अनुपस्थितीतच लग्न करणं पसंत करत आहेत.
लॉकडाउन असल्याने एका जोडप्याने खिडकीत उभं राहूनच लग्न केलं आहे. स्पेनच्या कोरुना येथील ही घटना आहे. स्पेनमध्ये ही कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 1300 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 25 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
स्पेनच्या अल्बा डीज आणि डेनियल कॅमिनोने कधी विचार ही केला नसेल त्यांना अशा प्रकारे लग्न करावं लागेल. लॉकडाऊन असल्याने या जोडप्याने बिल्डींगच्या खिडकीत उभं राहत लग्न केलं. यावेळी बिल्डींगमधील इतर जणांनी आपल्या आपल्या खिडकीतू त्यांना शुभेच्छा दिल्या.
डीजने म्हटलं की, त्याने आपल्या लग्नासाठी खूप खर्च केला होता. लग्न सोहळ्याचं ठिकाण देखील निश्चित झालं होतं. अनेक देशांमधून पाहूणे देखील आले होते. पण देशात कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास बंदी असल्याने त्यांना अशा प्रकारे लग्न उरकून घ्यावं लागलं. सोशल मीडियावर या लग्नाची सध्या चर्चा रंगली असून व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.