नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची प्रथम महिला मेलानिया ट्रम्प या पती-पत्नीच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा जोरदार रंगलीय. याचबद्दल एका मुलाखतीत मेलानिया यांना काही प्रश्न विचारण्यात आले... तेव्हा त्यांनी या सर्व चर्चा बाष्कळ असल्याचं म्हटलंय. या चर्चा आपल्यासाठी चिंतेचा विषय नाही कारण आपल्याकडे करण्यासाठी आणखी काही चांगल्या गोष्टी आहेत, असंही मेलानिया यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प पती-पत्नीच्या नात्याविषयी बोलताना मेलानिया यांनी 'नात्यात कोणतीही समस्या' नसल्याचं म्हटलंय. 'या गोष्टी ऐकण्यासाठी चांगल्या वाटत नाहीत' असंही मेलानियानं म्हटलंय. 


ट्रम्प यांच्यावर आरोप 


उल्लेखनीय म्हणजे, नुकतंच ट्रम्प यांच्यावर काही महिलांनी विवाहबाह्य संबंधांचे आरोप केलेत. ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स आणि प्लेबॉयची मॉडल कॅरेन मॅकडॉउल यांनी शारीरिक संबंधाचा दावा केलाय. 


कॅरनच्या म्हणण्यानुसार, २००६ साली ती १० महिन्यांपर्यंत नात्यात होती. तर स्टॉर्मीनंही २००६ मध्ये ट्रम्प यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा केलाय. त्यावेळी ट्रम्प आणि मेलानिया पती-पत्नी होते. 


स्टॉर्मीच्या म्हणण्यानुसार, २०१६ साली राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी या मुद्यावर आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत १३०,००० डॉलर्सचा करार झाला. परंतु, ट्रम्प यांनी आपल्यावरच्या या सर्व आरोपांना नकार दिलाय.


 



 


मेलानियाचं स्पष्टीकरण


याच विषयावर बोलताना एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मेलानियानं भाष्य केलंय. ट्रम्प पती-पत्नीत प्रेम आहे का? या प्रश्नावर मेलानियाला 'होय, आम्ही ठिक आहोत' एवढंच उत्तर देणं योग्य वाटलं. 


'ही माझ्यासाठी काळजी करण्याची गोष्ट नाही... आणि मी त्याकडे लक्षही देत नाही. मी एक आई आहे आणि अमेरिकेची प्रथम महिलाही... माझ्याकडे विचारासाठी आणि करण्यासाठी यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खरं काय आणि खोटं काय, हे मला माहीत नाही' असंही मेलानिया यांनी म्हटलंय.