मेक्सिको : गेल्या मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा जीव व्हॉट्सअॅपमुळे वाचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी आलेल्या या भूकंपामुळे डायना पचेको यांच्या ऑफिसची बिल्डींग कोसळली. त्यामुळे डायना ढिगाऱ्याखाली दबली गेली. डायना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या डायनाने मदतीसाठी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअॅप मेसेज केले. पण, सिग्नल नसल्याने मेसेज डिलिव्हर झाले नाहीत.


भूकंप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी डायनाच्या पतीला एक व्हॉट्सअॅप मेसेज आला आणि तो मेसेज होता डायनाचा. या मेसेजमध्ये डायनाने आपण अडकलेल्या ठिकाणाचं लोकेशन सांगितलं होतं. तसेच आपल्यासोबत इतरही सहकारी अडकल्याचं डायनाने मेसेजमध्ये म्हटलं होतं.


एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत डायनाचे पती गार्सिया यांनी सांगितलं की, माझ्या पत्नीचा मला मेसेज आला आणि हा कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीये. भूकंप झाल्यानंतर डायना कुठे आहे याची माहिती नव्हती त्यामुळे मी केवळ प्रार्थनाच करत होतो. पण डायनाचा मला व्हॉट्सअॅप मेसेज आला आणि त्यानंतर तिच्यासोबत इतरांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं.


डायनाने सांगितले की, ज्यावेळी ती ढिगाऱ्याखाली अडकली होती त्यावेळी बचाव पथकाचा तिला आवाज ऐकायला येत होता. आम्ही मदतीसाठी आवाज देत होतो मात्र, त्यांना ऐकायला जात नव्हतं. मग मी, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर मेसेज केले आणि सुदैवाने माझ्या पतीला माझा मेसेज मिळाला.