वॉशिंग्टन : कोरोनाचा अमेरिकेत सर्वाधिक संसर्ग झाला आहे. आतापर्यंत सुमारे 14 लाख लोकांना याची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे 1754 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांची संख्या 85,813 वर पोहोचली आहे, जी जगात सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे अमेरिकन सरकारने चीनला लक्ष्य केले आहे. चीनला पुन्हा एकदा परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी इशारा दिला आहे.


माईक पोम्पीओ यांनी ट्विट केले की, चीन किंवा त्याच्या साथीदारांनी कोरोना व्हायरस लस संशोधनाची चोरी करण्यावर भर देऊ नये. आम्ही याचा निषेध करतो आणि या गोष्टी थांबल्या पाहिजेत असे आवाहन करतो.


दुसर्‍या ट्विटमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी लिहिले की, चीन हा असा देश आहे जिथे या व्हायरसचा जन्म झाला आणि त्यांच्यामुळे हा विषाणू जगभर पसरला. कोरोना विषाणूशी संबंधित माहिती चीनने जगाला सांगितली नाही. ज्यामुळे आज ही अडचण निर्माण झाली.


विशेष म्हणजे कोरोनाबाबत अमेरिका सतत चीनला दोष देत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील आपल्या वक्तव्यांमधून सतत याचा उल्लेख करत असतात. अमेरिकेत गेल्या काही काळापासून अशी चर्चा आहे की, त्यांच्याकडून चीनवर काही निर्बंध घातले जाऊ शकतात, यासंदर्भात एक प्रस्तावही देण्यात आला आहे. ज्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेऊ शकतात.