Miss America स्पर्धेतून `बिकनी` ला बाय बाय
मिस अमेरिका या स्पर्धेला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास आहे.
अमेरिका : मिस अमेरिका या स्पर्धेला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास आहे. यंदाची मिस अमेरिका स्पर्धा चर्चेत आहे आणि यामागील कारणही तितकेच खास आहे. यंदा पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे.
मिस अमेरिका स्पर्धेत मोठा बदल
मिस अमेरिका स्पर्धा सध्या चर्चेत आहे कारण यंदा या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे बाय बाय बिकिनी.... अर्थात यावर्षीपासून मिस अमेरिका स्पर्धेतून बिकीनी हद्दपार होणार आहे. या स्पर्धेतल्या स्पर्धकांना त्यांच्या फक्त शारीरिक मापांवर जोखलं जाणार नाही, तर त्यांची बुद्धीमत्ता, त्यांचं यश आणि त्यांचे भविष्यातल्य़ा योजना, यांचाही विचार यंदाच्या वर्षीपासून केला जाणार आहे.काही स्पर्धकांनी बिकीनी राऊण्डमध्ये अवघडल्यासारखं होत असल्याची तक्रारही केली होती. यंदा या स्पर्धेच्या आयोजक तीनही महिलाच आहेत. आयोजक आणि स्पर्धत यांनी एकत्रितपणे बिकीनीला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॅनल इंटरव्ह्यू रंगणार
मिस अमेरिका स्पर्धेत यंदाच्या वर्षीपासून बिकीनी राऊण्डऐवजी पॅनल इंटरव्ह्यू अर्थात स्पर्धकाची मुलाखत घेतली जाणार आहे. मात्र या स्पर्धेतला इव्हिनिंग गाऊन राऊण्ड कायम असणार आहे. मिस अमेरिका या स्पर्धेला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास आहे.त्यामध्ये पहिल्यांदाच बाय बाय बिकीनीचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात या निर्णयावरुन अमेरिकेतल्या काही खोचक लोकांनी बिकीनी राऊण्ड नाही तर हवीच कशाला मिस अमेरिका स्पर्धा असा सूर लावायला सुरुवात केलीय. अमेरिकेत गेलं वर्षभर लैंगिक छळाविरोधातली #MeToo मोहीम गाजत आहे. त्यानंतर मिस अमेरिका स्पर्धेतला हा बदल निश्चितच स्वागतार्ह म्हणावा लागेल.