`मुडीज`ने रेटिंग वाढवल्याने `अच्छे दिन` येतील?
अमेरिकन रेटिंग एजन्सी मुडीज् नं भारतीय अर्थव्यवस्थेचा दर्जा सुधारला आहे. गेल्या 14 वर्षात प्रथमच मुडीज नं हे पाऊल उचललंय.
न्यूयॉर्क : अमेरिकन रेटिंग एजन्सी मुडीज् नं भारतीय अर्थव्यवस्थेचा दर्जा सुधारला आहे. गेल्या 14 वर्षात प्रथमच मुडीज नं हे पाऊल उचललंय..मुडीज् या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीनं दिलेल्या दर्जाच्या आधारावर अनेक परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशात गुंतवणूक करण्यासंदर्भातले निर्णय घेतात.
भारतीय अर्थव्यवस्थेला 'सकारात्मक' असा दर्जा
गेली 14 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर दर्जा दिल्यावर, आज 'मुडीज्'नं हा दर्जा उंचावलाय. यापुढे भारतीय अर्थव्यवस्थेला 'सकारात्मक' असा दर्जा देण्यात आलाय. गेल्या तीन वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणांच्या आधारे हा दर्जा देण्यात आला आहे.
जीएसटीमुळे पुढे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा
जीएसटीमुळे येत्या काळात अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल असं 'मुडीज'चं म्हणणं आहे. दरम्यान स्टॅडर्ड अँड पुअर या दुसऱ्या एका महत्वाच्या रेटिंग एजन्सीनं भारतीय अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारतीय शेअर बाजारात आनंदी आनंद
दरम्यान, आज मुडीज् च्या रेटिंगमुळे भारतीय शेअर बाजारात आनंदी आनंद पसरला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही मध्येही साधारण एक टक्क्याची वाढ नोंदवण्यात आलीय. बँकिंग क्षेत्रातले शेअर्स आज पुन्हा एकदा तेजीत आहेत.