जगभरात कोरोनाचा कहर, आतापर्यंत ३ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू
जगभरात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
नवी दिल्ली : जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे संपूर्ण जगात 3 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर रुग्णांची संख्या 44 लाखांवर गेली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. येथे 84 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 13 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमेरिकेनंतर रशियात सर्वाधिक कहर पाहायला मिळतोय. येथे 2 लाख 42 हजार 271 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ब्रिटनमध्ये 2 लाख 30 हजार 986 रुग्ण, स्पेनमध्ये 2 लाख 28 हजार 691 रुग्ण, इटलीमध्ये 2 लाख 22 हजार 104 रुग्ण, ब्राझीलमध्ये 1 लाख 90 हजार 137 रुग्ण, फ्रान्समध्ये 1 लाख 78 हजार 184 रुग्ण, जर्मनीत 1 लाख 74 हजार 98 रुग्ण, तुर्कीमध्ये 1 लाख 43 हजार 114 रुग्ण आणि इराणमध्ये 1 लाख 12 हजार 725 रुग्ण आढळले आहेत.
जॉन हॉफकिन्स विद्यापीठाच्या सीएसएसईच्या आकडेवारीनुसार, जगभरातील मृत्यूंच्या आकडेवारीचा विचार केला तर एकूण 33 हजार 264 मृत्यूंसह यूके दुसर्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये 31 हजार 106 जणांचा मृत्यू, फ्रान्समध्ये 27 हजार 104 जणांचा मृत्यू आणि ब्राझीलमध्ये 13 हजार 240 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा जगभरात कहर सुरु आहे. देश छोटा असो की मोठा, कमकुवत असो की सामर्थ्यवान, कोरोनाच्या कहरातून तो वाचलेला नाही. ज्यांना महासत्ता म्हटले जाते त्यांना कोरोनाशी लढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमेरिका ते युरोप आणि युरोप ते मध्यपूर्वेपर्यंत अनेक देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुऴे उध्वस्त झाली आहे. सर्वत्र लॉक-डाऊन आहे परंतु कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या कमी होत नाहीये. जगातील सर्व देश एकत्र येण्यास असमर्थ आहेत. तीन लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. सुमारे 44 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. जगातील एक तृतीयांश लोकसंख्या घरात कैद आहे. एक प्रकारे जग थांबलं आहे.