डान्स करताना 400 पेक्षा अधिक लोकांनी गमावला जीव, हा आजार नक्की कोणता?
अनेक संशोधने करून देखील शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत या आजाराचे रहस्य
फ्रान्स : गेल्या वर्षापासून देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोना या एका व्हायरसने संपूर्ण जगात अनेकांचे प्राण घेतले. पण कोरोना व्हायरस आधी अशा एका आजाराने थैमान घातलं होतं, ज्यामुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र आजाराविषयी सांगणार आहोत, ज्याच्यामुळे लोक डान्स करताना जीव गमावत होते. हा आजार फ्रान्समध्ये 1518 साली पसरला होता.
आता या आजाराला 500 हून अधिक वर्षे उलटून गेली आहेत, तरीही शास्त्रज्ञांना हे रहस्य कळू शकलेले नाही. 1518 मध्ये पसरलेल्या या आजाराने फ्रान्समध्ये 400 हून अधिक लोकांना घेरले होते. त्याला डान्स एपिडेमिक म्हणतात. सर्वप्रथम एक तरुणी या आजाराच्या विळख्यात आली. त्यानंतर या आजाराने रुद्र रूप धारण केलं.
1518 च्या जुलै महिन्यात एका तरुणीने अचानक डान्स करायला सुरुवात केली. या मुलीचे नाव फ्राउ ट्रॉफी होते. डान्स करताना तिचे भान हरपले होते आणि ती डान्स करण्यात इतकी तल्लीन झाली होती की ती डान्स करताना घराबाहेर रस्त्यावर आली होती. तरूणीला असं डान्स करताना पाहून लोकांना आश्चर्य वाटलं.
या घटनेदरम्यान डान्स करताना 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली आणि लोक प्रचंड घाबरले. यानंतर फ्रान्सच्या अनेक भागात अनेक लोकांचा डान्स करताना मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. अशात कोणी डान्स करत असल्याची बातमी समोर येताच त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात येत होते.
फ्रान्सच्या या रहस्यमय घटनेबद्दल त्या काळातील शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले होते, परंतू आजाराचे कोणतेही खरे कारण सापडले नाही. शास्त्रज्ञांनी या आजाराला 'डान्सिंग प्लेग' असे नाव दिले. हळूहळू हा आजार आपसूकच संपला. आज या आजाराला 500 वर्षे उलटूनही शास्त्रज्ञ या आजाराचे रहस्य शोधू शकलेले नाहीत.