Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडी आईस्क्रिम! एका स्कूपच्या किंमतीत खरेदी कराल फोर व्हिलर
Most expensive ice cream: यासंदर्भातील माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिली असून त्यांनी या आईस्क्रिमची किंमत एवढी किंमत का आहे यासंदर्भातील माहितीही सविस्तरपणे दिली आहे. ही आईस्क्रिम जपानमधील एका कंपनीने तयार केली आहे.
Most expensive ice cream: उन्हाळ्यातील उष्णतेवरील रामबाण उपाय म्हणजे आईस्क्रिम! तसं हल्ली कोणत्याही ऋतुमध्ये आईस्क्रिम खाल्लं जातं. मात्र उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्यासारखं सुख नाही असं मानणारे अनेकजण आहे. अगदी लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांनी आईस्क्रिम म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटतं. अर्थात आईस्क्रिममध्येही अनेक प्रकार आणि फ्लेव्हर्स आहेत. मात्र प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात त्यामुळे वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या आईस्क्रिमला चांगली मागणी असल्याचं दिसतं. आईस्क्रिम ही सर्वांनाच परवडावी म्हणून मर्यादीत ठेवली जाते. मात्र जपानमधील एका कंपनीने एवढ्या महाग किंमतीला आईस्क्रिम विक्री सुरु केली आहे की या आईस्क्रिमच्या किंमतीत एखादी छोटी गाडी विकत घेता येईल. बरं या आईस्क्रिमची किंमत इतकी का आहे हे सुद्धा सांगण्यात आलं आहे.
किंमत नेमकी किती?
या कंपनीच्या आईस्क्रिमची दखल थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही (Guinness World Records) घेतली आहे. गिनीजकडून या आईस्क्रिमला जगातील सर्वात महागडी आईस्क्रिम असा सन्मान मिळाला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आईस्क्रिमची किंमत किती आहे? तर ही आईस्क्रिम जपानमध्ये 8 लाख 73 हजार 400 येनला म्हणजेच भारतीय चलनानुसार 5 लाख 20 हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. जपानमधील सिलॅटो नावाच्या ब्रॅण्डने हे आईस्क्रिम बनवलं आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही आईस्क्रिम फारच खास गोष्टींचा वापर करुन बनवण्यात आली आहे. म्हणूनच या आईस्क्रिमची किंमत एवढी जास्त ठेवण्यात आली आहे.
काय आहे आईस्क्रिममध्ये?
गिनीजने दिलेल्या माहितीनुसार, या आईस्क्रिमची किंमत इतकी अधिक असण्याचं कारणं आहे यामध्ये असलेला अल्बा नावाचा पदार्थ. हा पदार्थ इटलीवरुन जपानमध्ये आयात केला जातो. अल्बा हे एकप्रकारचं दुर्मिळ व्हाइट ट्र्फल आहे. याची किंमत प्रती किलोला 2 मिलियन जपानी येन म्हणजेच जवळजवळ 11.9 लाख रुपये प्रतिकिलो इतकी आहे. तसेच पार्मिंगियानो रेजिगो आणि सेक ली यासारखे दुर्मिळ पदार्थही या आईस्क्रिममध्ये वापरण्यात आलेले आहेत. ही आईस्क्रिम सर्व्ह करताना ती सोन्याच्या वर्खाने सजवली जाते.
दीड वर्षांचा कालावधी लागला...
केवळ जागातील सर्वात महागडी आईस्क्रिम बनवण्याचा कंपनीचा उद्देश नव्हता तर युरोपीयन आणि जपानी दोन्ही खाद्य संस्कृतींचा मिलाफ घडवून आणण्याचा कंपनीचा विचार होता. सॅलिटो कंपनीने ओसाका शहरातील रिवी या प्रसिद्ध फ्यूजन रेस्तराँमधील मुख्य शेफ ताडायोशी यामादा यांना यासाठी नियुक्त केलं. "कंपनीने या आईस्क्रीमसंदर्भात अगदी टेस्टींगचं सेशनही ठेवलं होतं. यामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी ही आईस्क्रिम चवीला फार उत्तम आहे. व्हाइट ट्रफलचा सुगंध आणि स्वाद नाकावर आणि जिभेवर ताबा मिळवतो," असं या आईस्क्रीमबद्दल गिनीजच्या वेबसाईटवर नमूद केलं आहे. "या आईस्क्रिमचा स्वाद उत्तम असावा म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. ही चव विकसित करण्यासाठी आम्ही दीड वर्ष मेहन घेतली. गिनीजने या आईस्क्रीमची दखल घेतल्याने आमचे सर्वच प्रयत्न सत्कारणी लागल्याचं आम्हाला वाटत आहे," असं ही आईस्क्रिम बनवण्याच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये सहभागी झालेल्या सदस्याने सांगितलं.