परवेझ मुशर्रफ यांना असाध्य आजार?
आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबत कोणताही धोका पत्कारू इच्छित नाही.
नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती आजारपणामुळे झपाट्याने खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. मुशर्रफ यांना नक्की कोणता आजार झालेला आहे, याची नेमकी माहिती कळू शकलेली नाही. मात्र, त्यांची तब्येत झपाट्याने खंगत आहे, अशी माहिती मुशर्रफ यांच्या पक्षाच्या नेत्याने 'द डॉन' या वृत्तपत्राला दिली.
आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबत कोणताही धोका पत्कारू इच्छित नाही. मुशर्रफ यांना पाकिस्तानात परतायचे आहे. मात्र, त्यांच्याविरुद्धचा खटला खुल्या न्या्यालयात चालवला जाईल आणि त्यांना गरज पडेल तेव्हा उपचारासाठी देशाबाहेर जाऊन दिले जाईल, अशी हमी देण्यात यावी, असे या नेत्याने सांगितले.
७५ वर्षांच्या मुशरर्फ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांनी २०१६ मध्ये दुबईतील वैद्यकीय उपचारांचे कारण देत पाकिस्तान सोडला होता. तेव्हापासून पाकिस्तानात न परतल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने त्यांना अनेकदा पाकिस्तानमध्ये परतण्याचे आदेश दिले होते.