पंतप्रधान मोदींना भाऊ मानणारी करीमा बलोचच्या मृत्यू मागचं गूढ?
पंतप्रधान मोदींना मानत होती भाऊ...
मुंबई : करीमा बलोचचं काय झालं, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. बलुच लोकांच्या हक्कासाठी लढणारी करीमा ही पंतप्रधान मोदींना भाऊ मानायची. तिचा बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढा सुरू होता. पण तेवढ्यात कॅनडातल्या एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला. किडनॅप, टॉर्चर आणि मर्डरभोवती फिरणारी ही मिस्ट्री काय आहे.
बलुचिस्तानच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते पाकिस्तानच्या निशाण्यावर आहेत. करीमाचं हे ट्विट..... तिनं ट्विट केलं त्याची तारीख नीट पाहा.... 14 डिसेंबर 2020..
करीमा ट्विटमध्ये म्हणते....
किडनॅप, टॉर्चर, मर्डर..... हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे हेच भविष्य....
या ट्विटनंतर बरोब्बर सात दिवसांनी कॅनडा पोलिसांनी ट्विट केलं. ट्विट होतं करीमा मेहराब गायब असल्याचे.
करीमा बेपत्ता झाल्याच्या या ट्विटनंतर पुन्हा ९ तासांनी टोरंटो पोलिसांनी ट्विट केलं. बेपत्ता झालेली करीमा मेहराब सापडली. पण तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख या ट्विटमध्ये नव्हता.
आता हे सगळे ट्विटस जोडले की गूढ आणखी वाढतं. १४ डिसेंबरला करीमाचं शेवटचं ट्विट होतं, ज्यामध्ये तिनं किडनॅपिंग, मर्डरचा उल्लेख केला होता. पुढच्या सात दिवसांत करीमा गायब झाली. आणि टोरंटोमधल्या एका फ्लॅटमध्ये करीमाचा मृतदेह सापडला. करीमाचा मृत्यू नेमका कसा झाला.... एखादा अपघात की तिला कुणी मारलंय ?
बलुच लोकांवर पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांमुळे २०१६ मध्ये करीमानं पाकिस्तान सोडलं. तिच्यावर चार वेळा प्राणघातक हल्ले झाले होते.
पाकिस्तानातून करीमा कॅनडामध्ये गेली. पण तिथेही ती सुरक्षित नव्हती. कॅनडातही पाकिस्तानी लष्कराची नजर असल्याचं ती सांगायची.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०१६ मध्ये लालकिल्ल्यावरुन बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. त्यावेळी करीमानं मोदी आपले भाऊ आहेत, त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती.
करीमा आयुष्यभर बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी लढली. एका फ्लॅटमध्ये झालेला तिचा मृत्यू खळबळजनक आहे. गूढ वाढवणारा आहे. धक्कादायक आहे.