NASA Sunita Williams Live Video : मूळच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स साधारण मागील महिन्याभरापासून अंतराळात असून, बोईंग स्टारलायनर या त्यांच्या यानामध्ये हेलियम लीक आणि तत्सम काही तांत्रिक बिघाडांमुळं त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. असं असलं तरीही कथित स्वरुपात विलियम्स आणि विल्मोर यांना धोका असल्याच्या चर्चांना येणारं उधाण पाहता अखेर नासाकडूनच या दोन्ही अंतराळवीरांना कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासानं नुकतंच एका सत्राच्या माध्यमातून अंतराळात असणाऱ्या सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याशी थेट संपर्क साधत ते अगदी सुखरुप असल्याचं संपूर्ण जगाला दाखवून दिली. Live संवाद साधतान विल्मोर आणि विलियम्स यांनी अंतराळातील परिस्थितीवर भाष्य करत तेथील सद्यस्थिती सर्वांसमोर आणली. यावेळी या दोन्ही अंतराळवीरांनी एका वादळाचाही उल्लेख केला. 


अवकाशातून पृथ्वीवर होणारे वातावरणीय बदल पाहणं अतिशय भारावणारं असल्याचं सांगत विलियम्स यांनी एका चक्रीवादळाच्या निर्मितीसंदर्भात भाष्य केलं. आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टी क्षेत्रामध्ये आपण वादळाची निर्मिती होताना पाहगिली आणि त्यानंतर हेच चक्रिवादळ टेक्सासच्या किनाऱ्यावरही धडकल्याचं त्या म्हणाल्या. अंतराळातून आपण या चक्रीवादळाची काही क्षणचित्र टीपत ती पृथ्वीवर पाठवल्याचंही सांगितलं. आश्चर्याची बाब म्हणजे हे तेच चक्रीवादळ होतं, ज्यामुळं भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकातील विजयानंतरही मायदेशी परतू शकला नव्हता. हे होतं, बेरिल चक्रीवादळ. 


हेसुद्धा वाचा : पृथ्वीपासून 408 km दूर, अंतराळात कसा होतो चंद्रोदय? NASA नं फोटोसहित दाखवली दृश्य...



इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून नासाच्या या दोन्ही अंतराळवीरांनी वादळ एका वेगळ्या दृष्टीकोनातून अनुभवलं. त्यांना यशस्वीरित्या वादळाचा केंद्रबिंदू दिसत होता. याशिवाय वादळ शमण्यापर्यंतची प्रक्रिया पाहून ते दोघंही भारावले होते. दरम्यान, आपण लवकरत या मोहिमेला पूर्ण करत योग्य वेळी सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतणार असल्याचं आशावादी वक्तव्यही या दोन्ही अंतराळवीरांनी केलं आणि त्यांचा हा व्हिडीओ संपूर्ण जगात ट्रेंड करू लागला.