नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक गोष्टी वगळता कारखाने, ऑफिस, गाड्या, वाहतूक अशा सर्वच गोष्टी बंद आहेत. त्यामुळे याचा चांगला, सकारात्मक परिणाम आपल्या हवामान, वातावरण, पर्यावरणावर होताना दिसतोय. घरातील दरवाजे-खिडक्यांमधून येणारी हवा अधिक स्वच्छ आणि सुरक्षित झाली आहे. अमेरिकी संस्था 'नासा'ने भारतातील एक सुखद धक्का देणारा फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नासा'ने नुकताचा भारताचा एक फोटो जाहीर केला आहे. वैज्ञानिकांनी 2016 ते 2020 मधील छायाचित्रांद्वारे, भारतात धूळ - मातीचा, प्रदूषणाचा स्तर पूर्णपणे कमी झाल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्ये सॅलेलाईटद्वारा घेण्यात आलेल्या फोटोत संपूर्ण भारतभरात केवळ धूळ, माती, प्रदूषणाचा थर असल्याचं दिसत होतं. तर आता लॉकडाऊन सुरु झाल्यापासून भारत, भारतातील जमिन अतिशय स्वच्छ दिसत असल्याचं 'नासा'ने प्रसिद्ध केलेल्या फोटोत दिसत आहे.


पर्यावरण तज्ज्ञांनी, लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं आहे. उदा. कारखाने बंद असल्याने नद्याचं पाणी स्वच्छ झालं आहे. रखडलेल्या बांधकामांमुळे वातावरणात धूळ-माती अतिशय कमी झाली आहे. त्याशिवाय वाहनं आणि कारखान्यांमधून निघणारा धूर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने, हवेची गुणवत्ता बऱ्याच अंशी सुधारली आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारतात लॉकडाऊन आहे. सर्वकाही बंद असल्याने कामकाजही ठप्प आहे. मात्र यामुळे पर्यावरणाला फायदा झाला आहे. हवेचा स्तर, गुणवत्ता सुधारली आहे. तर झाडे-झुडपंही चांगली वाढताना दिसतायेत.