नासाने  युएफओ आणि एलियन्ससंबंधी एक नवा अभ्यास जारी केला आहे. यामध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात एलियन्स आणि युएफओसंबंधी मागील अनेक काळापासून एलियन्स आणि युएफओसंबंधी (unidentified anomalous phenomenon) अनेक रहस्य असून, त्यांचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन मृतदेह ठेवण्यात आले होते. हे एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यातच नासाने गुरुवारी युएफओ आणि एलियन्ससंबंधी रिपोर्ट जारी केला असून मेक्सिकोवरील या घटनेवरही भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेक्सिकोच्या संसदेत काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष सादर करण्यात आले होते. स्वयंघोषित यूएफओ शास्त्रज्ञ जेमे मॉसन यांनी हे जीवाश्म एक हजार वर्षं जुने असल्याचा दावा केला होता. हे जीवाश्म एलियन असल्याचं मॉसन यांचं म्हणणं आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत नासाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारण्यात आलं. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या खगोल भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आणि UAP अहवालाचे अध्यक्ष डेव्हिड स्पर्गेल यांनी आपल्याला या नमुन्यांबद्दल फार काही माहिती नसल्याचं सांगितलं. तसंच यासंबंधी पारदर्शकता ठेवली जावी असा आग्रह केला आहे. 


"मी ही एक अशी गोष्ट आहे जी मी फक्त ट्विटरला पाहिली आहे. जेव्हा तुमच्याकडे अशा असामान्य गोष्टी असतात, तेव्हा तुम्ही तो डेटा सार्वजनिक करु इच्छिता," असं डेव्हिड स्पर्गेल म्हणाले आहेत. तसंच आपल्याला हे नमुने नेमके कोणत्या प्रकारचे आहेत याची माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 


डेव्हिड स्पर्गेल यांनी मेक्सिको सरकारला आवाहन केलं आहे की, "जर तुमच्याकडे एखादी अजब गोष्ट असेल तर ते नमुने वैज्ञानिकांसाठी उपलब्ध करा".


संसदेत दाखवण्यात आले एलियन्सचे मृतदेह


मंगळवारी मेक्सिको काँग्रेसने दाखवलेल्या मृतदेहांचं डोकं आणि शऱीर छोटं असून तीन बोटं दिसत होती. पत्रकार आणि स्वयंघोषित यूएफओ शास्त्रज्ञ जेमे मॉसन यांनी हे अवशेष वास्तविक एलियन्स असल्याचा दावा केला. पण याआधी मॉसन यांनी एलियन्ससंबंधी केलेले सर्व दावे खोटे ठरले होते. पण मॉसन यांनी मंगळवारी संसदेत याप्रकरणी साक्ष दिली. यामध्ये त्यांनी हे दोन मृतदेह एलियन्सचे असल्याचा दावा केला.


या प्रजाती आपल्या जगातील (पृथ्वीवरील) उत्क्रांतीचा भाग नाहीत, ते यूएफओच्या भंगारातून सापडलेले नाहीत, तर ते डायटम मॉस खाणीमध्ये जीवाश्माच्या रूपात सापडले असं त्यांनी साक्षीत सांगितलं. मात्र, हे जीवाश्म एलियनचे असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी फेटाळला आणि हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा आरोप केला. 


UFO वर नासाने रिपोर्ट केला सादर


नासाने युएफओ अभ्यासाचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये त्यांनी युएफओच्या अभ्यासासाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाची गरज आहे, ज्यामध्ये आधुनिक उपग्रहांचा समावेश असेल असं सांगितलं. नासाने एका स्वतंत्र टीमकडे हे काम सोपवलं होतं. या टीमने 33 पानांचा अहवाल सोपवला आहे. युएफओसंबंधी नकारात्मक दृष्टीकोन माहिती गोळा करण्यात अडथळा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


यूएफओ अभ्यासासाठी अधिक प्रगत उपग्रह आणि उडणाऱ्या अज्ञात वस्तूंकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल यासह नवीन वैज्ञानिक तंत्राची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आलं आहे.