नासा मंगळावर पाठवणार हेलिकॉप्टर
अमेरिकन अंतराळ संस्था नासा मंगळ ग्रहाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळवण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : अमेरिकन अंतराळ संस्था नासा मंगळ ग्रहाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळवण्याच्या तयारीत आहे. नासा २०२० मधील मंगळ मोहीमेत अतिप्रगत रोव्हरसोबत छोटे हेलिकॉप्टर पाठवणार आहे. पृथ्वीवरील हवाई वाहन परग्रहावर पाठवण्याची ही पहिलीच वेळ असेल. हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर नेऊन ठेवल्यानंतर रोव्हरला सुरक्षित अंतरावर थांबण्याचे निर्देश मिळतील. बॅटऱ्या चार्ज झाल्यावर आणि चाचण्या घेतल्यानंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून स्वचलित हेलिकॉप्टरला उड्डाणाच्या कमांड मिळतील. ३० दिवसांत हेलिकॉप्टरची पाच उड्डाणे होतील.
या स्वचलित हेलिकॉप्टरचं वजन साधारणतः ४ पाऊंड इतकं आहे. पातळ ब्लेडच्या साहाय्याने हे हेलिकॉप्टर उड्डाण घेतं. या पंखाचा वेग मिनिटाला तीन हजार फेऱ्या असा असेल. पृथ्वीवर हेलिकॉप्टर ४० हजार फुटांपर्यंत उड्डा़ण करू शकते. मंगळाच्या वातावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाच्या एक टक्का आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर जमिनीवर न स्थिरावता एक लाख फूट उंचीवरच तरंगत असेल. त्याचे उड्डाण तिथून पुढील उंचीवर होईल. जुलै २०२० मध्ये रोव्हर आणि हेलिकॉप्टर घेऊन अग्निबाण मंगळाच्या दिशेने झेपावेल. फेब्रुवारी २०२१ मध्ये तिथं पोहोचेल. हे रोव्हर मंगळाच्या मातीच्या अभ्यास करेल आणि हे वातावरण मानवी वस्तीसाठी कितपत पोषक आहे याचा अंदाज घेईल.