लाहोर: भ्रष्टाचार प्रकरणात १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांनी कन्या मरियम हे दोघेही शुक्रवारी रात्री लंडनहून मायदेशात परतले. विमानतळावरच शरीफ यांना पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटेबिलीटी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. तिथून हेलिकॉप्टरने शरीफ यांना इस्लामाबादला नेण्यात आलं. तिथून त्यांची रवानगी रावळपिंडीच्या अदिआला कारागृहात होणार आहे. उद्या शरीफ यांना अकाऊंटेबिलीटी ब्युरोच्या न्यायालयात हजर केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातील न्यायालयाने  शरीफ यांना १० वर्षांची तर मरियम यांना ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू असल्याने शरीफ तातडीने पाकमध्ये परतू शकले नव्हते. आज ते कन्येसह मायदेशात परतले. लंडनहून परतत असताना अबुधाबी येथे त्यांचे विमान थांबले. सुमारे दोन तास उशिराने त्यांचे विमान पाकिस्तानात पोहोचले. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.१५ वाजता शरीफ यांचे विमान लाहोर विमानतळावर उतरले. त्यानंतर लगेचच शरीफ व त्यांच्या कन्येला अटक करण्यात आली.  


नवाझ शरीफ यांची आई बेगम शमीम अख्तर आणि शेहबा शरीफ यांचा मुलगा सलमान यांना विमानतळावर आत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. शरीफ यांच्याअटकेनंतर लाहोरच्या रस्त्यावर मोठी गर्दी उसळली आहे.  गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाहोरच्या रस्त्यावर पाकिस्तान रेंजर्स तैनात करण्याची वेळ आलीय. शरीफ समर्थक आणि विरोधक असे दोन्हीकडले लोक रस्त्यावर उतरलेत.  यामध्ये पाच पोलीस जखमी झाले आहेत. ३७८ जणांना अटक करण्यात आली आहे. लाहोरला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.