नेपाळमध्ये भारतीय नोटाबंदी, नव्या नोटा ठरवल्या बेकायदा
नेपाळमध्ये भारतातील नव्या नोटा आता स्वीकारल्या जाणार नाहीत.
नेपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यावेळी चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णय त्यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर २००, ५००, आणि २ हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने एक निर्णय घेतला आहे. नेपाळने सुद्धा नोटाबंदी जाहीर केली आहे. नेपाळमध्ये भारतातील नव्या नोटा आता स्वीकारल्या जाणार नाहीत. या नव्या नोटा सोबत बाळगणे, तसेच या नोटांमार्फत खरेदी करणे आणि नेपाळला या नोटा घेऊन जाणे बेकायदा ठरवण्यात आले आहे. नेपाळचे सूचना मंत्री गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली. नेपाळ सरकारने हे आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
नेपाळ पर्यटन स्थळ असल्याने अनेक पर्यटक इथे येतात. या निर्णयाचा परिणाम नेपाळच्या पर्यटनावर होणार आहे. या निर्णयामुळे नेपाळला गेलेल्या भारतीयांची सुद्धा गैरसोय होणार आहे. भारतातील २००, ५०० आणि २ हजारच्या नोटांना नेपाळ सरकारने मान्यता दिली नव्हती पण आतापर्यंत या नोटांना बेकायदा घोषित केले नव्हते. नेपाळमध्ये या नोटांचा व्यवहार सुरु होता. पण नेपाळ सरकारने आता या भारतीय नोटांना बेकायदा घोषित केले आहे. या नोटांचे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचं निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे भारतीयांना नेपाळमध्ये ५०-१०० च्या नोटा न्याव्या लागतील किंवा नेपाळच्या सीमेवर भारतीय चलन नेपाळच्या चलनात बदलून घ्यावे लागेल. आता पर्यंत भारतीय चलन नेपाळमध्ये चालत होते. या निर्णयाचा परिणाम नेपाळ पर्यटनावर पडेल. पण देशाच्या हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे नेपाळ सरकारचे म्हणणे आहे.