नवी दिल्ली : एकिकडे India भारत आणि China चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारी तणावाची परिस्थिती निवळत नाही तोच दुसरीकडे Nepal नेपाळसोबत सुरु असणारा सीमावादही आता डोकं वर काढत आहे. चीनशी सुरु असणाऱ्या चर्चा आणि त्यांच्याकडून येणाऱ्या कारवायांचा भारताकडून उत्तर दिलं जात असतानाच आता नेपाळमध्येही भारतविरोधी भूमिकेसाठी पूरक वातावरण तयार केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविषयी नेपाळच्या जनतेमध्ये द्वेषाची भावना पसरवण्यासाठी म्हणून नेपाळमध्ये रेडिओ वाहिनी अर्थात एफएमवर भारतविरोधी भाषणं आणि गाणी वाजवण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तराखंडच्या काही एफएम वाहिन्यांवरही अशा प्रकारची गाणी ऐकू आली आहेत. नेपाळच्याच धारचुवला एफएम या वाहिनीवर अशा प्रकारची गाणी वाजवली जात असल्यामुळं आता पुन्हा एका नव्या मुद्द्यानं डोकं वर काढलं आहे. 


लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळचेच असल्याचं भासवत तशा प्रकारचा नकाशा नेपाळच्या संसदेत मंजूरही करण्यात आला. त्यातच आता नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचं पद कायम ठेवण्यासाठी विविध कुरापती सुरु असल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. भारतानं कशा प्रकारे नेपाळच्या हद्दीत येणारे हे भूभाग हिसकावून घेतले याची प्रचिती देत त्याच धर्तीवर भारतविरोधी भूमिका बळावणाऱी गाणी एफएमवर चालवणी जाणं हा त्यातीलच एक भाग असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. 


 


फक्त एफएमवरच नव्हे, तर सोशल मीडियावरही अशा प्रकारची गाणी दिसून आल्यामुळं भारतीयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकंदरच चीनसोबतचा संघर्ष सुरु असतानाच भारत- नेपाळ सीमावादानंही नवं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आता याप्रकरणी भारताची अधिकृत भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.