मुंबई : ब्रिटननंतर दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. या विषाणूला 501.V-2 असं नाव देण्यात आलं आहे. आफ्रिकेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये तो आढळून येत असल्याचं येथील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, संसर्गाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने पसरते आहे. विषाणूच्या नव्या प्रकाराचा हा परिणाम असल्याचं येथील सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विषाणूच्या प्रभावाची माहिती प्राथमिक निष्कर्षावर अवलंबून आहे मात्र तरिही आत्तापासूनच उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सरकानं म्हटलं आहे. 


संसर्ग वाढीमुळे दक्षिण आफ्रिकेत नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये या देशात सरासरी नव्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढलं आहे.