न्यूयॉर्क: १५ ऑगस्टला भारताने आपला ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शाळा, सरकारी कार्यालये, अनेक सोसायट्यांमध्ये तसेच खेडोपाडी देखील सगळ्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशभक्तीचा हा उत्साह फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील दिसून आला. कारण परदेशांत राहत असलेल्या देशबांधवांनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे अमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इमारतीला तिरंग्याच्या रंगांची रोषणाई करण्यात आली होती. शहराच्या कानाकोपऱ्यातून ही इमारत अगदी सहज दिसते. त्यामुळे तिरंग्यात रंगलेली ती इमारत बघताना भारतीयांना विशेष आनंद आणि अभिमान वाटत होता. 
न्यूयॉर्कमधील मॅनहट्टन परिसरात एम्पायर स्टेट ही इमारत आहे. या इमारतीची उंची १२५० फूट म्हणजेच ३८१ मीटर इतकी आहे. तर इमारतीवरील अँटेनासहित इमारतीची उंची १४५४ फूट म्हणजेच ४४३.२ मीटर इतकी आहे. न्यूयॉर्क - द एम्पायर स्टेट यावरून इमारतीला एम्पायर स्टेट असे नाव देण्यात आले आहे. १९३१ मध्ये या इमारतीचं काम पूर्ण झालं. ४० वर्ष सर्वात उंच इमारत म्हणून या इमारतीची ख्याती होती. 



१९७० मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर उभी राहिल्यानंतर ती सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाऊ लागली. ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा मान पुन्हा एकदा एम्पायर स्टेट या इमारतीच्या नावे झाला. २०१२ मध्ये पुन्हा एकदा वर्ल्ड ट्रेड सेंटर दिमाखात उभी राहिली आणि आपला सगळ्यात उंच इमारतीचा मान तिने परत मिळवला. एम्पायर स्टेट ही इमारत अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत असून जगातील उंच इमारतींमध्ये तिचा ३५ वा क्रमांक लागतो.