मुंबई :  चीनमध्ये उदयास आलेलं कोरोना व्हायरसचं धोकादायक वादळ आता वुहानमध्ये शमलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशत पसरवलेल्या या विषाणूने चीन मध्ये हजारे लोकांचा बळी घेतला आहे. पण आताच्या घडीला वुहानमध्ये एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे ही बातमी संपूर्ण  जगासाठी दिलासादायक ठरणारी आहे.  वुहानने COVID-19 विरूद्धच्या युद्धात विजय मिळवल्याचा दावा  जागतिक संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अदनोम गेब्रेयसस यांनी केला आहे. त्यामुळे वुहान शहराप्रमाणे बाकी देश कधी कोरोना व्हायरच्या विळख्यातून सुटतील हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगायचं झालं तर चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदय झाला असला तरी इटलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. न्यूज एजेंन्सी एएफपीच्या वृत्तानुसार शुक्रवारी २४ तासांमध्ये इटलीत ६२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत इटलीत ४ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. 


शिवाय भारतात देखील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नुकताच नवी मुंबईत कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. तर सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७५ वर गेली आहे.  देशात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आणखी ११ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी ७ मुंबईत तर ४ रुग्ण पुण्यातले आहेत. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता  योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री नागरिकांना करत आहेत. 


मुंबईतील खासगी रुग्णालयात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि  हृदयरोग असे आजार होते. एच.आर हिराणी रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झालाय.