नवी दिल्ली - अनेकांना ज्याची मनापासून धास्ती वाटते ती आर्थिक मंदी पुन्हा एकदा येण्याची शक्यता एका विख्यात अर्थशास्त्रज्ञाने वर्तविली आहे. चालू वर्षाच्या अखेरिस आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमॅन यांनी म्हटले आहे. देशाची आर्थिक निती निश्चित करणाऱ्यांच्या अपुऱ्या अनुभवामुळे आणि तयारीमुळे जग पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकेल, अशी शक्यता पॉल क्रुगमन यांनी व्यक्त केली. त्यांच्या मतानुसार २०१९च्या अखेरिस आर्थिक मंदीचा अनुभव जगातील विविध देशांना येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईमध्ये एका परिषदेत बीजभाषण करताना पॉल क्रुगमॅन म्हणाले, कोणत्या एका मोठ्या गोष्टीमुळे आर्थिक मंदी येईल, अशी शक्यता फार कमी आहे. पण आर्थिक क्षेत्रातील चढ-उतार आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयश आल्यामुळे आर्थिक मंदी येण्याची शक्यता जास्त आहे. या वर्षाच्या अखेरिस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस आर्थिक मंदी येऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक मंदी आल्यावर त्यावर कशी उपाययोजना करायची, याबद्दल अजून आपल्याकडे तयारी झालेली नाही. आर्थिक मंदीपासून देशाची अर्थव्यवस्था कशी वाचवायची, याचेही तंत्र अद्याप विकसित झालेले नाही. बाजारातील चढ-उतारातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय बॅंकांकडे कायमच साधनांची कमतरता असते, याकडेही क्रुगमॅन यांनी लक्ष वेधले. 


आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यापार युद्ध आणि संरक्षणवाद यांच्यापेक्षा व्यक्तिगत अजेंडा जास्त प्रभावशाली असतो. त्यामुळे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवले जाते, असे पॉल क्रुगमॅन यांनी म्हटले आहे.