सेऊल : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने मोठा विध्वंस केला आहे. कोरोनामुळे मोठ्याप्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. जगातले बहुतेक देश लॉकडाऊन झाले आहेत. जगभरात ही परिस्थिती असताना उत्तर कोरियाने पूर्वेला दोन छोट्या लांबीच्या बॅलिस्टिक मिसाईलचा मारा केला आहे. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ (जेसीएस)ने ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे देश हाय अर्लटवर असतानाच उत्तर कोरियाने हे परिक्षण केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेऊलमधली वृत्तसंस्था योनहपने जेसीएसच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार दोन मिसाईल सकाळी ६.१० मिनिटांनी पूर्वेला असलेल्या वॉनसन शहराच्या उत्तरपूर्वेला टाकण्यात आली. २० सेकंदांच्या अंतराने या दोन्ही मिसाईलने हल्ला करण्यात आला. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा याबाबतचा पुढचा तपास करत आहेत, असं जेसीएसकडून सांगण्यात आलं.


'जगभरात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. असं असताना उत्तर कोरियाकडून अशाप्रकारे लष्करी पाऊल उचलणं चुकीचं आहे. हे सगळं लगेच थांबवण्याचं आवाहन आम्ही करतो. आमचं लष्कर या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे,' अशी प्रतिक्रिया जेसीएसने दिली आहे. उत्तर कोरियाने या वर्षात बऱ्याच हत्यारांचं परीक्षण केलं आहे.