उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. किम ह्रदयाच्या शस्रक्रियेनंतर मृत्युशी झुंज देत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी रात्री किम जाँग उन यांचा‌ मृत्यू झाल्याची चर्चा चीनमध्ये सुरू झाली. तर त्याचवेळी किम जाँग उन यांची विशेष ट्रेन उत्तर कोरियाच्या एका रिसॉर्टबाहेर दिसल्याचं वृत्त सॅटेलाइट इमेजसह देण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीबाबत वेगवेगळे तर्क आणि चर्चा सुरू आहे.

वॉशिंग्टनमधील उत्तर कोरिया मॉनिटरींग प्रोजेक्टच्या रिपोर्टनुसार किम जाँग उन यांची विशेष ट्रेन उत्तर कोरिया रिसॉर्टच्या बाहेर उभी असल्याचं दिसत आहे. सॅटेलाइटने घेतलेल्या फोटोतून ते स्पष्ट दिसतंय. मॉनिटरींग प्रोजेक्ट '38 नॉर्थ'ने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, 21 आणि 23 एप्रिल रोजी वोन्सानच्या लिडरशिप स्टेशनवर किम जाँग उन यांची ट्रेन पाहण्यात आली. रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, या तारखांदिवशी हे स्टेशन किम यांच्या कुटुंबीयांसाठी राखीव ठेवण्यात आलं होतं.  रॉयटर वृत्तसंस्थेनं याबाबत कोणताही दावा किंवा किम हे वोन्सानमध्ये असल्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, रिसॉर्टबाहेरील ट्रेनची उपस्थिती, उत्तर कोरिया हुकूमशाहच्या ठिकाणाबाबत किंवा त्यांच्या आरोग्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देत नाही.  दरम्यान, आता बिजिंगमधील एका सॅटेलाईट चॅनेलने सोशल मीडिया Weiboवर एक खळबळजनक दावा केला आहे. हाँगकाँगमधील सॅटेलाईट टेलिव्हिजनच्या उपसंचालक शिजियान शिंगजाओ  ( Shijian Xingzou) यांनी उच्च पदस्थ सूत्रांचा हवाला देत, Weibo अकाऊंटवर उत्तर कोरिया हुकूमशाहचं निधन झाल्याचं वृत्त दिलं आहे. शिजियान चिनी परराष्ट्रमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्या Weibo अकाऊंटवर 1.5 कोटी फॉलोअर्स आहेत.

मात्र Weibo अकाऊंटवरुन देण्यात आलेल्या वृत्ताला उत्तर कोरियासह कोणत्याही इतर देशांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. उत्तर कोरियातील सरकारी न्यूज एजेन्सी KCNAकडूनही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जगभरातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जाँग उन 12 एप्रिल रोजी शेवटचे दिसले होते. तेव्हापासूनच्या त्यांची तब्येत ठिक नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. 'द इंडिपेंडंट'च्या रिपोर्टनुसार, शनिवारी उत्तर कोरियाच्या मिलिट्री फाऊंडेशन डे या कार्यक्रमातही ते सहभागी झाले नव्हते.



आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्डियोवस्क्यूर या आजारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून किम यांच्यावर उपचार सुरु आहेत. याचदरम्यान त्यांची तब्येत अधिक खालावली. याबाबत दक्षिण कोरिया आणि अमेरिका मीडिया रिपोर्ट्समध्ये दोन प्रकारचे दावे करण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्समध्ये अमेरिकी गुप्तचर सुत्रांनुसार, किम जाँग उन एकतर कोमामध्ये आहेत किंवा ब्रेन डेड आहेत, असं सांगण्यात आलं आहे. तर दक्षिण कोरियाच्या गुप्तचर सुत्रांनुसार, किम यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया सुरु असून त्यांच्या तब्येतीबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगण्यात आलंय.

दरम्यान, दक्षिण कोरिया सरकार आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी बुधवारी रॉयटर्सचा हवाला देत हा अहवाल केवळ अफवा असल्याचं सांगितलं.  मात्र किम यांची तब्येत ठिक आहे तर ते सर्वांसमोर का येत नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.