पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा उघड, पाक भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र
पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याचे गुप्तवार्ता माहिती अहवालात उघड झाली आहे.
नवी दिल्ली : सातत्याने पुरावे द्या, पुरावे द्या म्हणून बोंबलणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याचं गुप्तवार्ता माहिती अहवालात उघड झाली आहे. पाकिस्तान दहशतवादी प्रशिक्षण केंद्र झाले आहे. दहशतवादी तयार करण्याचा कारखानाच असल्याचे पुढे येत आहे. शेकडो तरूणांची माथी भडकवून देशोधडीला लावण्याचा क्रूर खेळ पाकिस्तानकडून सुरु आहे. तरीही आमच्या भूमित दहशतवादाला खतपाणी घालणारी केंद्र नसल्याचा दावा करण्यात येत आहे. पाकिस्तान हा संपूर्ण देशच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करावा, अशी गंभीर परिस्थिती आहे. पाकिस्तानची भूमी खुलेआम मृत्यूचा खेळ खेळण्यासाठी वापरली जात आहे.
आपल्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना करू देऊ नका, असा इशारा अमेरिका, भारत या देशांनी सातत्याने पाकिस्तानला दिला. तरीही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे आपल्या भूमीवर नाहीत, अशी भूमिका घेत पुरावे द्या, पुरावे द्या अशी बोंबाबोंब जगभरात करत असते. मात्र भारताच्या गुप्तवार्ता अहवालात पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीवर एक दोन नाही तर तब्बल १६ दहशतवादी तळ असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच गेल्यावर्षात या प्रशिक्षण केंद्रात तब्बल ५६० तरूणांना दहशतवादाचं प्रशिक्षण देण्यात आल्याचे समजत आहे.
यातले ५ दहशतवादी तळ पाकिस्तानच्या भूमीवर आहेत. त्यापैकी ३ खैबर पख्तुनवा या प्रांतातल्या मनशेरा जिल्ह्यात तर दोन पाकिस्तानातल्या पंजाबात आहेत. तर ११ दहशतवादी तळ हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. यापैकी ५ मुजफ्फराबाद, कोटली आणि बर्नाला या भागात आहेत. तर बोई, लाका ए गैर, शेरपाई, डोईलीन, खालीद बिन वालीद, गाऱ्ही, दुपट्टा या भागातही दहशतवादी तळ आहेत. आयईडीच्या सहाय्याने स्फोटकांचा स्फोट घडवणे, स्नायपर अटॅक, पाण्याखालून दहशतवादी हल्ला आणि ड्रोनचे प्रशिक्षण इत्याही प्रशिक्षण दहशतवाद्यांना इथे मिळत आहे.
भारताच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. भारतावर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो, असा इशारा स्वतः नौदलप्रमुखांनी दिला आहे. भारताच्या या गुप्तवार्ता अहवालाला आता जगाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यापुढे दहशतवादी गटांना अभय नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंच आहे. दहशतवादाविरोधात भारताने आता जोरदार आघाडी उघडली आहे. दहशतवादाचा भस्मासूर नष्ट करण्याची जबाबदारी एकट्या भारताची नाही. अमेरिका, रशिया, चीन यांनीही यात सकारात्मक भूमिका घेऊन पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे.