नवी दिल्ली: सोशल मीडियावर काही ट्रेंड येतात आणि पाहता पाहता ते मोठे आव्हानही निर्माण करतात. खरेतर सोशल मीडियाच्या लाटेत कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल आणि त्याचा वास्तवात परिणाम काय होईल हे अनिश्चित असते. त्यामुळे कधी कधी अत्यंत धोकादायक असेही ट्रेंड निर्माण होतात. हे ट्रेंड नेटीजन्स अंधपणे फॉलो करतात आणि मग त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर सध्या रॅपर ड्रेकच्या गाण्यावर #InMyFeelings नावाच एक ट्रेंड भलताच व्हायरल झाला आहे. हा ट्रेंड फॉलो करण्यासाठी लोक चालत्या कारमधून रस्त्यावर उतरत आहेत आणि डान्स करत आहेत. हा ट्रेंड मजेशीर आहे. पण, तो तितकाच धोकादायकही आहे. कारण या ट्रेंडने अनेक लोकांना आतापर्यंत धोका पोहोचवला आहे.


#DoTheShiggy आणि #InMyFeelings


हा ट्रेंड म्हणजे एक डान्स चॅलेंज आहे. जो कॉमेडियन शिग्गीने सुरू केला. हे चॅलेंज रॅपर ड्रेक (Drake) याच्या गाण्यावर करण्यात आला होता. या गाण्याची पहिली ओळ आहे, 'किकी, तू माझ्यावर प्रेम करतोस, मी योग्य मार्गावर आहे?', या गाण्यावर हा ट्रेंड सुरू झाला. आता तर या ट्रेंडने मूळ गाण्यालाही पाठी टाकत लोकांच्या मनावर प्रभूत्व मिळवले आहे. लोक चालत्या कारमधून थेट रस्त्यावर उतरत आहे आणि डान्स करत आहेत. लोक #DoTheShiggy आणि #InMyFeelings या हॅशटॅगखाली आपला रेकॉर्डेड डान्स सोशल मीडियावर टाकत आहेत.