वॉशिंग्टन : Oklahoma hospital Firing: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. बुधवारी, ओक्लाहोमा येथील तुलसा सिटी येथील हॉस्पिटल आवारामध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, तुलसा पोलिसांना बुधवारी माहिती मिळाली की सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल कॉम्प्लेक्समधील नताली मेडिकल बिल्डिंगमधील डॉक्टरांच्या कार्यालयात रायफल घेऊन एक व्यक्ती उभा आहे. माहिती मिळताच पोलीस तात्काळ कारवाई करत घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत तरुणांने गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. गोळीबार केल्यानंतर शूटरने स्वतःवर गोळी झाडली.


हल्ल्यामागचा हेतू अस्पष्ट


पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संशयिताकडे मोठी बंदूक होती. मात्र, त्याच्या हल्ल्यामागचा हेतू काय होता, हे समजू शकलेले नाही. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर या व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली.


 दरम्यान, दुसरीकडे व्हाईट हाऊसही या घटनेवर लक्ष ठेवून आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना तुलसा येथे झालेल्या गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे. सततच्या गोळीबाराबद्दल राष्ट्रपती अत्यंत चिंतेत आहेत. ज्यो बायडेन यांनी अलीकडेच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्याकडे युनायटेड स्टेट्समधील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी सल्ला मागितला.


गोळीबाराच्या घटनांत वाढ 


अमेरिकेत वाढत्या हँडगन कल्चरमुळे गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. मंगळवारी, न्यू ऑर्लीन्समधील हायस्कूल पदवीदान समारंभात झालेल्या गोळीबारानंतर राजवाड्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. याआधी गेल्या आठवड्यात उवाल्डे टेक्सासमधील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात 19 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या स्वतंत्र डेटा संकलन संस्थेच्या अहवालानुसार, 2022 मध्ये आतापर्यंत अमेरिकेत 212 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.