नवी दिल्ली : ओमिक्रॉन (Omicron) हा कोरोनाचा नवीन प्रकार घबराट पसरवत आहे. कारण जगातील अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. आफ्रिका आणि युरोपीयन प्रदेशातील अनेक देशांमध्ये या नव्या कोरोना व्हायरसची लागण झालेली प्रकरणे वाढल्याचे WHO ने म्हटले आहे. एवढेच नाही तर आफ्रिकेत कोरोनाबाधितांची संख्या 93 टक्क्यांनी वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी बुधवारी माहिती दिली की, डब्ल्यूएचओच्या सहा क्षेत्रांमधील किमान 23 देशांमध्ये कोरोनाच्या या प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.


WHO चे म्हणणे आहे की, वेगाने बदलणारा ओमिक्रॉन कोरोना विषाणू जगभरात पसरू शकतो. भविष्यात यातून संसर्ग वाढण्याचाही धोका आहे. एवढेच नाही तर याचे गंभीर परिणाम काही भागात दिसून येत आहेत. डब्ल्यूएचओ या विषाणूचा धोका आणि लसीद्वारे प्रदान केलेली प्रतिकारशक्ती निष्प्रभ करण्याची क्षमता तपासण्यात गुंतलेली आहे. WHO ने आपल्या सर्व 194 सदस्य देशांना लसीकरणाला गती देण्याचा सल्ला दिला आहे.


Omicron virus देशात येण्यापासून रोखण्यासाठी जगातील सर्व देश कडक निर्बंध लादत आहेत. जपानने प्रवासी निर्बंध कडक केले आहेत. यूएस आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्क्रीनिंग करत आहेत. ऑस्ट्रियाने 11 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे, तर पोर्तुगालने घरातही मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. 


जर्मनीच्या इंटेन्सिव्ह केअर असोसिएशनने इशारा दिला आहे की ख्रिसमसच्या आधी आयसीयूची गरज असलेल्या कोविड रुग्णांची संख्या नवीन उच्चांक गाठेल.