भारत-पाक युद्ध होता होता टळलं, तांत्रिक चुकीमुळे पेटलं असतं युद्ध
दोन दिवसांपूर्वी एक विचित्र घटना घडलीये, की त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिणगी पडू शकली असती.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी एक विचित्र घटना घडलीये, की त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिणगी पडू शकली असती. नेमकं काय आणि कुठे घडलं, बघुयात रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात तणावाची स्थिती असताना भारत-पाकिस्तानातही युद्धाचा भडका उडता उडता राहिला. कारण घटनाच अशी विचित्र घडली आहे. (on 9 march accidental missile government of india has taken a serious view and ordered a high level court of inquiry)
त्याचं झालं असं की 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी पाकिस्तानातील मिन चन्नू शहराजवळ एका मोकळ्या जागेत एक क्षेपणास्त्र कोसळलं.
अधिक तपास केला असता हे भारतीय क्षेपणास्त्र असल्याचं आढळून आलंय. सुदैवानं या क्षेपणास्त्रामध्ये कोणताही दारूगोळा नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पाकिस्ताननं इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांना पाचारण करून घडलेल्या घटनेची कल्पना दिली. दुसरीकडे या घटनेचं निमित्त करून भारताविरोधात गळा काढण्याची संधी अर्थातच पाकिस्ताननं सोडली नाहीये.
भारत सरकारनं या घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. मेंटेनन्सच्या वेळी चुकून क्षेपणास्त्राची दिशा भरकटली आणि ते पाकिस्तानात जाऊन पडल्याचं लष्करानं म्हटलंय.
सध्याच्या संवेदनशील वातावरणात अशा प्रकारचा अपघात होणं खरोखर धोकादायक आहे. हे क्षेपणास्त्र लोडेड असतं किंवा पाकिस्ताननं ते हवेत उडवून त्याचा गैरअर्थ घेतला असता, तर दोन्ही देशांत युद्ध भडकायला वेळ लागला नसता.