कोरोनाचे अवघ्या १३ दिवसांत १० लाखांवर रुग्ण
कोणत्या देशांत सर्वाधिक रुग्ण?
ब्युरो रिपोर्ट : जगभरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. गेल्या काही दिवसांत जगभरातल्या बहुतांशी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून रुग्णसंख्याही झपाट्यानं वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १३ तब्बल १० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० लाखांवर गेली आहे आणि त्यातील पहिल्या दहा लाख रुग्णांचा टप्पा पार होण्यास ९३ दिवस लागले होते. तर पुढचे दहा लाख रुग्ण अवघ्या १३ दिवसांत झाले. त्यामुळे कोरोनाचे संकट किती झपाट्यानं वाढलं याचा अंदाज या आकडेवारीवरून येऊ शकेल.
कुठे वाढले कोरोनाचे रुग्ण?
जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार बुधवारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाखांवर गेली. तर या जीवघेण्या आजारानं १ लाख ३० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू हे युरोप आणि अमेरिकेत आहेत.
अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार उडाला असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्णही अमेरिकेतच आहेत. अमेरिकेत ६ लाखांवर कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये १ लाख ७७ हजारांवर कोरोना रुग्ण आहेत. इटलीमध्ये १ लाख ६५ हजारांवर कोरोनाचे रुग्ण आहेत. इटलीमध्ये बुधवारी एका दिवसात २ हजार ६६७ नवे रुग्ण आढळले. विशेष म्हणजे १३ मार्चनंतरची ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. पण इटलीत मृतांची संख्या मात्र अजूनही अधिकच आहे.
जर्मनीत १ लाख ३३ हजारांवर रुग्ण असून रुग्णसंख्येच्या बाबतीत जर्मनी चौथ्या क्रमांकावर आहे. जर्मनीमध्ये सुद्ध ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरु आहे.
जगातील सर्वाधिक कोरोना बळी अमेरिकेत गेले आहेत. गेले काही दिवस अमेरिकेत सरासरी दोन हजार लोक दर दिवशी कोरोनाचे बळी ठरत आहेत. अमेरिकेत २८ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीत २१ हजार ५०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर स्पेनमध्ये १८ हजार ५०० हून अधिक लोक कोरोनामुळे दगावले आहेत.