मुंबई: आपल्याकडे लहान मुलं सर्रास एखादी गोष्ट उचलून तोंडात घालण्याच्या मागे असतात. हातात मिळेल ती गोष्ट तोंडात पहिल्यांदा खायची असते. मात्र अशा गोष्टींमुळे अनेकदा चिमुकल्यांच्या जीवाला धोका पोहोचतो. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानग्यांना जपण्यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घेणं गरजेचं असतं. एका चिमुकल्यानं एक लहानशी वस्तू खाल्ली आणि त्याच्या जीवावर बेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वर्षाच्या चिमुकल्यानं चक्क चॉकलेच समजून घड्याळाचा सेल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली.या चिमुकल्यानं बटनाच्या आकाराचा सेल टॉफी समजून गिळला. या चिमुकल्याला त्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं. तब्बल 28 शस्त्रक्रियेनंतर या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात आला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


या चिमुकल्याचे रुग्णालयातील फोटो त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुऴे आपली मुलं नेमकं काय करतात? कोणत्या गोष्टी खातात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं खूप गरजेचं आहे. 


डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार या चिमुकल्यानं बटणाच्या आकाराचा सेल गिळल्यानंतर त्याचा जीव वाचण्याची केवळ 10 टक्के शक्यता होती. डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितलं की तो पूर्णपणे बरा होणं कठीण आहे. इलियट लेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार ओली या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी 28 वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. 


या चिमुकल्याच्या हृदयावरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या चिमुकल्याला खाण्यासाठी जेव्हा त्रास जाणवू लागला तेव्हा डॉक्टरकडे दाखवण्यात आलं. सुरुवातीला डॉक्टरने उपचार केले मात्र हा त्रास वाढत गेला. चिमुकल्याचा एक्स रे काढण्यात आला. त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आलं. हा एक्स रे पाहून वडील आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली.


या चिमुकल्याच्या गळ्याजवळ बटणाच्या आकाराची बॅटरी अडकली होती. हे काढण्यासाठी 28 वेगवेगऴी ऑपरेशन करण्यात आले. त्याच्या शरीरात बॅटरीतील कॉस्टिक सोडा गेल्यानं त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. तो कधीच पुन्हा पूर्वासारखा होऊ शकत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे अशी माहिती वडिलांनी दिली.


इलियट लेनन यांनी आपल्या मुलाचा फोटो शेअर करत पालकांना सावध राहण्याचा आणि सतर्क होण्याचं आवाहन केलं आहे. मुलं काय करतात काय तोंडात घालतात याकडे करडी नजर ठेवून लक्ष द्या. मुलांच्या हातात कोणतीही गोष्ट देताना काळजी घ्या. अशा प्रकारच्या छोट्या गोष्टींपासून मुलांना नेहमी दूर ठेवण्याचं आवाहन देखील या चिमुकल्याच्या वडिलांनी केलं.