Google Jobs Cut : गुगलसंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.  स्वेच्छेनं राजीनामा देणा-या कर्मचा-यांना गुगल तब्बल एक वर्षांचं वेतन देणार आहे. गुगलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात येत आहे. या नोकर कपातीच्या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी गूगल कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचारी कपात प्रक्रियेत वेग आणण्यासाठी गुगलनं आपल्या कर्मचा-यांसाठी ही खास ऑफर देऊ केली आहे. इंग्लंडमधल्या 8 हजार कर्मचा-यांपैकी 500 कर्मचा-यांची कपात गुगलला करायची आहे. त्यासाठी गुगलनं ही ऑफर देऊ केली आहे. जर्मनीत अशीच ऑफर अॅमेजॉनकडून देण्यात आली आहे. 


अल्फाबेटमध्ये नोकर कपात


गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या कपातीचा फटका कर्मचा-यांसोबत रोबोटलाही बसला होता.अमेरीकेच्या टेक कंपनीनं 100 रोबोटना नोकरीवरुन काढून टाकले होते. अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे. याआधी कंपनीनं जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.


मेटामध्ये मोठी नोकरकपात


फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं देखील मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली होती. यावर्षी मेटानं तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. इतकंच नाही तर मार्क झुकेरबर्गनं नवी नोकरभर्ती ही थांबवली.  गेल्यावर्षीच मेटानं 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिलीय. तसंच कर्मचाऱ्यांची माफीही मागितली. 2022 पासून कंपनीनं 2.90 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.  आर्थिक संकटांमुळे ही कपात केली जात आहे. 


अमेझॉनमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात नोकरकपात


अमेझॉनने लेऑफच्या पहिल्या राऊंडमध्ये गेल्या काही महिन्यात एकूण कर्मचा-यांपैकी 18 हजार कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवला होता. जगभरात बँकिंग संकट आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर ई कॉमर्स कंपनी अमेझॉन ही नोकरकपात करत आहे. कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी ही घोषणा केलीय. aws, जाहिरात आणि ट्वीच प्राईम या सेक्शनमधील कर्मचा-यांवर संकट आहे. अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे कंपनीने ही नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नोकरकपातीचं वादळ आता स्टार्टअप्समध्येही आलंय. देशातील 82 स्टार्टअप्सनी 23 हजारांहून अधिक कर्मचा-यांना कामावरून कमी केलंय. भविष्यात स्टार्टअप्समधील नोकरकपात वाढत जाणार आहे. नोकर कपात करणा-यांमध्ये 4 युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्य असलेल्या स्टार्टअप्सचाही समावेश आहे. बायजूज, ओला, ओयो, मिशो, एमपीएल, लिव्हस्पेस, इनोव्हॅक्सर, उडान, अनअकॅडमी, वेदांतू या नामांकित स्टार्टअप्ससह इतरांचाही या नोकरकपातीत समावेश आहे.