जगात केवळ 3 अशा व्यक्ती ज्यांना परदेशात फिरण्यासाठी पासपोर्टची गरजच नाही
जगात अशाही व्यक्ती आहेत ज्यांना कुठेही जगभरात फिरायचं असेल तर पासपोर्टची गरज लागत नाही.
मुंबई : परदेशी जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपली धावाधाव होते ती पासपोर्टसाठी. कारण दुसऱ्या देशात जायचं म्हटलं की पासपोर्ट हा गरजेचाच. जर नसेल तर तो काढावा लागणार. मात्र तुम्हाला माहितीये का? जगात अशाही व्यक्ती आहेत ज्यांना कुठेही जगभरात फिरायचं असेल तर पासपोर्टची गरज लागत नाही. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हो...खरंच मात्र जगभरात पासपोर्ट शिवाय फिरण्याची मुभा असणाऱ्या व्यक्ती केवळ 3 आहेत.
आपल्या देशाचं सरकार देत असलेल्या पासपोर्टमध्ये आपण कोण आहोत, नेमके कुठचे आहोत, आपलं नाव, आपण कसे दिसतो हे सांगण्याऱ्या गोष्टी असतात. हे अधिकृत ओळखपत्र असतं ज्याच्या मदतीने आपण सुरक्षितरित्या जगात कुठेही जाऊ शकतो. मात्र जगातील या 3 व्यक्ती सोडल्या तर सर्वांना पासपोर्ट घेऊन फिरणं अगदी बंधनकारक आहे.
फार क्वचितच लोकांना या 3 जणांबद्दल माहिती असेल. जर तुम्हाला यांच्याबद्दल माहिती नसेल तर ही बातमी नक्की वाचा.
पासपोर्टशिवाय फिरता येणाऱ्या या 3 व्यक्ती म्हणजे ब्रिटनचा राजा, जपानची राणी आणि जपानचा राजा! यामध्ये कोणत्याही देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनाही सूट नाहीये. या 3 व्यक्तींना सोडून सर्वांना पासपोर्ट असणं आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वीच चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाले. आई आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांनी या पदाची जबाबदारी स्विकारली आहे. महाराज होताच ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कुठेही जाण्यासाठी मुभा देण्यात यावी तसंच त्यांच्या प्रोटोकॉलचीही काळजी घेतली जावी, असे ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांना कळवलंय.
राजा चार्ल्सच्या आधी त्याची आई राणी एलिझाबेथ दुसरी यांना पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याची मुभा होती. सिंहासनावर बसलेल्या राजा किंवा राणीलाच पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार आहे. दरम्यान राजा चार्ल्स तिसरा यांच्या पत्नीला ही मुभा नाहीये. त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज लागते.
दुसरीकडे जपानचा राजा नारूहितो असून त्याची पत्नी मसाको ओवादा या जपानच्या राणी आहेत. इथे पासपोर्टशिवाय परदेशात जाण्याची पद्धत 1971 मध्ये सुरू झालीये.