तेल उत्पादक देशांची संघटना `ओपेक`ची व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक
कच्च्या तेलाच्या दरांना लगाम घालण्यासाठी उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.
व्हिएन्ना : तेल उत्पादक देशांची संघटना, ओपेकची आज व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक होते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरांना लगाम घालण्यासाठी उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. अर्थात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्पादनात कपात न करण्यासाठी ओपेकवर दबाव टाकला आहे. रशियादेखील उत्पादन कपातीला फारसा अनुकूल नाही. मात्र ओपेकमध्ये दबदबा असलेल्या सौदी अरेबिया दिवसाला १३ लाख बॅरलची कपात करण्यास उत्सुक आहे.
गुरूवारी कपातीबाबत निर्णय घेतल्यानंतर ओपेकच्या संलग्न देशांसोबत शुक्रवारी बैठक होणार असून त्यानंतरच कपातीचा निर्णय घेतला जाईल. उत्पादनात कपात झाल्यास कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भारतातीत इंधनाच्या दरांवर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात कपात होते का आणि झाली तर नेमकी किती होते, याकडे भारताचंही लक्ष लागलं आहे.