कराची : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या अत्यंत तणावाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना भारताविरोधी लढण्यास बढावा देणे, सीमारेषेचे उल्लंघन करणे, कुलभूषण जाधव प्रकरण, मुंबई अतिरेकी हल्ला, पुलवामा दहशतवादी हल्ला अशा अनेक प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येते. सीमारेषेपासून खेळाच्या मैदानापर्यंत भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी असल्याचे दिसून येते. अशा वेळी विरोधी देशाचा झेंडा कोणी फडकवाला आणि त्यांचे गाणे वाजवले तर ? हो. हा प्रकार पाकिस्तानमध्ये घडला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये कराचीतील एका शाळेतील विद्यार्थी भारतीय गाण्यावर नाचताना दिसले. यानंतर या शाळेची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाळेतील विद्यार्थी समारंभात 'फिर भी दिल है हिंदोस्तानी' हे गाणे वाजवले जात असून मागच्या स्क्रिनवर तिरंगा फडकताना दिसतोय आणि विद्यार्थीही थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाक प्रशासनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सिंध सरकारच्या खासगी संस्था निरीक्षण आणि मान्यता संचनालयाने एक नोटीस जारी केली. 'एका शिक्षण संस्थेमध्ये या पद्धतीचे वर्तन हे राष्ट्रीयत्वाच्या विरुद्ध आहे. हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही', असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. 



शाळेत अशाप्रकारचे गाणे वाजवल्याने राष्ट्रीयत्वाला ठेच पोहोचली असल्याचे सांगत शाळेच्या मालकाला बुधवारीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ साधारण एक आठवड्यापूर्वी शेअर करण्यात आला होता. यानंतर शाळेवर भारतीय संस्कृतीला बढावा देण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या पूर्ण कार्यक्रमाच्या चौकशीसाठी एक त्रिसदस्यिय समिती गठीत करण्यात आली आहे.